मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार कलाकाराची जोडी म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांच्याकडे पाहिले जाते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्याबरोबरच निवेदिता सराफ या देखील उत्तम अभिनेत्री आहेत. नुकतंच निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांनी दिलेला एक कानमंत्र सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवेदिता सराफ यांनी नुकतंच सौमित्र पोटे यांच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, याबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकावेळी अशोक सराफ यांनी कोणता कानमंत्र दिला, याबद्दलही सांगितले.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

“मी जेव्हा ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाच्या वाचनाला गेले होते त्याआधी मी ‘तुझ्या माझ्या नावाचं’ नाटक केलं होतं. हे नाटक महेश मांजरेकर आणि सुधीर भट यांनी निर्मित केले होते. ते नाटक केल्यानंतर मी जेव्हा वाडा चिरेबंदी नाटकाच्या वाचनासाठी गेले आणि तिथे चंदू इतका अप्रतिम वाचतो, त्याचं वाचन ऐकताना टेन्शन येतं. त्याची भाषा वैगरे या गोष्टी अप्रतिम असतात.

मी घरी आल्यावर अशोकला म्हटलं, मला हे जमेल असं काही वाटत नाही. मी त्याच्यासमोर उघडं पडेन की मला अभिनयच करता येत नाही. त्यावर अशोक मला म्हणाला होता, नाही म्हणणं खूप सोपं आहे. तू काय आता त्याला नाही म्हणशील. तू चॅलेंज घे ना आणि समजा काही काळ लोटल्यानंतर जर तुला तुझ्या दिग्दर्शकांनी सांगितलं की तुला हे जमत नाही, तू हे करु नकोस, तर बघ ना… पण ती वेळ तू स्वत:वर आणून देऊ नकोस, अशारितीने अभिनय कर”, असा किस्सा निवेदिता सराफ यांनी सांगितला.

आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

दरम्यान निवेदिता सराफ या गेल्या अनेक वर्ष विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहेत. त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत झळकत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress nivedita saraf talk about ashok saraf giving advice during drama nrp
Show comments