Maha Khumbh Mela 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत कोट्यावधी भाविकांनी पवित्र स्नान केलं. जनसामान्यांपासून ते दिग्गज मंडळी महाकुंभ मेळ्यात सहभागी होताना दिसत आहेत. तसंच कलाकार मंडळीदेखील महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी महाकुंभ मेळ्याला पोहोचली होती. यावेळी तिने स्वामी गोविंद देव गिरी महाराजांचं दर्शन घेतलं. तसंच त्यांच्याकडून महाकुंभ मेळ्याविषयी जाणून घेतलं. याचा व्हिडीओ प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्राजक्ता माळीनंतर आता आणखीन लोकप्रिय अभिनेत्री प्रयागराजमध्ये पोहोचली आहे. यासंदर्भात तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
२६ फेब्रुवारीपर्यंत असणाऱ्या महाकुंभ मेळ्यात नुकतीच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पोहोचली. तिने यावेळी पवित्र स्नान केलं. याचा फोटो आणि व्हिडीओ प्राजक्ताने इन्स्टाग्राम शेअर केला आहे. महाकुंभ मेळ्यातील प्राजक्ताचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
प्राजक्ता गायकवाडने पवित्र स्नान करतानाचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “शेड्यूलमधून कसा वेळ मिळेल? कसं जाणं होईल? काहीच माहीत नव्हतं… पण १४४ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला जायचं म्हणजे जायचं असं मनाशी ठरवलं होतं आणि अखेर तो योग आलाच…“गंगा, यमुना, सरस्वती संगम”…धर्मो रक्षति रक्षितः”
प्राजक्ता गायकवाडच्या या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं की, आपण भाग्यवान आहोत आपल्याला हा सोहळा अनुभवता आहे. मीही नुकताच जाऊन आलोय. तसंच दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, “खूप छान ताई, संस्कृती जपणारी एकमेव अभिनेत्री.”
दरम्यान, प्राजक्ता गायकवाडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘स्वराज्य संविधान’ चित्रपटात झळकणार आहे. याआधी प्राजक्ता ‘फौजी’, ‘गूगल आई’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. आतापर्यंत तिने ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत साकारलेली महाराणी येसूबाईंची भूमिका खूप गाजली होती.