Ranveer Allahbadia Controversy: लोकप्रिय युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सर्व स्तरातून रणवीरवर टीका केली जात आहे. आता ‘अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशन’ (AICWA)ने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ‘इंडियाज गॉट लेटेंट’ च्या कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली जात आहे. तसंच या कार्यक्रमाच्या निर्मात्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवरून मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

रणवीर अलाहाबादियाच्या प्रकरणावर आता मराठी कलाकारदेखील व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेता पुष्कर जोग, श्रेया बुगडेनंतर तृतीयपंथी अभिनेत्री प्रणित हाटेने आपलं परखड मत मांडलं आहे. तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. प्रणित हाटे नेमकी काय म्हणाली? जाणून घ्या…

अभिनेत्री प्रणित हाटेने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, “हे किती हास्यास्पद आणि मुर्खपणाचे आहे. जेव्हा हॉस्पिटलमध्ये मुलीवर बलात्कार झाला तेव्हा हे गृहमंत्री कुठे होते? आणि आता एका विनोदाच्या प्रकरणात हे दखल घेणार? वाह रे वाह.”

प्रणित हाटे इन्स्टाग्राम स्टोरी
प्रणित हाटे इन्स्टाग्राम स्टोरी

रणवीर अलाहाबादियाचं आक्षेपार्ह वक्तव्य

काही दिवसांपूर्वी रणवीर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी झाला होता. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, तुला आयुष्यभर तुझ्या आई-वडिलांना सेक्स करताना पाहायला आवडेल? की तुला त्यांच्यात सामील होऊन ते थांबवायला आवडेल? रणवीरच्या याच आक्षेपार्ह वक्तव्यावर सध्या गदारोळ माजला आहे. युट्यूबने ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा रणवीरचा भाग हटवला आहे. तसंच मुंबई पोलीस रणवीरची चौकशी करत आहेत.

दरम्यान, रणवीर अलाहाबादिया नावाजलेला युट्यूबर आहे. ‘बीयरबाइसेप्स मीडिया वर्ल्ड’चा तो संस्थापक आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. रणवीरचे ‘एक्स’वर सहा लाखांहून जास्त, इन्स्टाग्रामवर ४५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि युट्यूब चॅनेलवर १.०५ कोटींहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला गौरविण्यात आलं होतं. त्याला ‘डिसरप्टर ऑफ द इअर’ हा पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

Story img Loader