Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपायला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे आता सदस्यांमधली स्पर्धा वाढली आहे. सुरुवातीपासून एकमेकांसाठी, एकत्र खेळणारे सदस्य आता स्वतःसाठी खेळताना दिसत आहेत. म्हणून सध्या चुरसीची स्पर्धा पाहायला मिळत आहेत. अशातच एक मराठी अभिनेत्री ‘बिग बॉस’वर संतापली आहे. बिग बॉस पक्षपाती आणि घाणेरडा खेळ खेळत असल्याचं तिने विधान केलं आहे. पण अभिनेत्री असं का म्हणत आहे? जाणून घ्या…
अलीकडेच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात लगोरीचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये जी टीम विजयी होणार होती ती मालक म्हणून आठवडाभर हरलेल्या टीमला म्हणजे सांगकाम्याकडून काम करून घेणार होती. लगोरीच्या टास्कसाठी ‘बिग बॉस’ने निक्की, धनंजय, वर्षा, सूरज आणि अभिजीत, अंकिता, जान्हवी, पंढरीनाथ ही टीम केली होती. एक-शून्य अशा फरकाने निक्कीची टीम विजयी झाली आणि ती मालक बनली. त्यामुळे आता हरलेली टीम म्हणजे अभिजीत, अंकिता, जान्हवी आणि पंढरीनाथ हे मालकांनं दिलेलं काम करताना दिसत आहेत. याच लगोरीच्या टास्कवरून अभिनेत्री प्रणित हाटे ‘बिग बॉस’वर संतापली आहे.
हेही वाचा – “हिंदू मुलीच्या प्रेमात पडलास, तर २ लग्न करणार का?” अरबाज पटेल म्हणाला, “आमच्या धर्मात चार…”
अभिनेत्री प्रणित हाटे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रणित म्हणतेय, “ज्यांनी बिग बॉस पाहिलं असेल आणि ज्यांना एक छोटी गोष्ट कळली असेल. त्याच्यासाठी मी आज व्हिडीओ बनवला आहे. बघू त्या गोष्टी कोणाकोणाल्या कळल्या आहेत. बिग बॉसला निक्कीला काम करून द्यायचंच नाहीये. तर स्पष्ट सांगा, निक्की तू काम करू नकोस. कारण तू निक्कीच्या बिग बॉसमध्ये खेळतेय.”
“२५ सप्टेंबरचा लगोरा लावायचा जो टास्क होता. त्यात सूरज आणि जान्हवीचा खेळाची वेळ १० मिनिट ५० सेकंद होती. या संपूर्ण वेळेत दोघंजण लढत होते. त्यामुळे जान्हवी तुला सॅल्युट आहे; तू ज्यापद्धतीने हा टास्क खेळली आहेस. ती कमाल खेळली आहेस. त्यानंतर वर्षाताई आणि अंकिता खेळण्यासाठी आले. या दोघी फक्त चार मिनिटं खेळल्या. चार मिनिटांत लगेच त्यांचा बझर वाजला आणि सूरज-जान्हवीचा १० मिनिटांनंतर बझर वाजला. बिग बॉस तुम्ही इतका पक्षपाती आणि घाणेरडा खेळ खेळताय. जर तुम्हाला खरंच निक्कीला तसंच बसवायचं असेल तर म्हणा, बस आणि घरी ट्रॉफी घेऊन जा. एवढा टास्क तरी खेळवायची काय गरज आहे? १० मिनिटं कुठे आणि चार मिनिटं कुठे? एकदम विचित्र आहे,” असं स्पष्ट प्रणित हाटे म्हणाली.
नेटकरी काय म्हणाले?
प्रणितच्या हाटेच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आता तर असंच वाटतं की, निक्कीबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं की आम्ही तुला टॉफी देणार.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “म्हणून रितेश देशमुख होस्ट करत नसावेत. इकडे तर बिग बॉसच पक्षपाती आहेत. यासाठी मी गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस बघत नाहीये. प्रेक्षकांना वेड समजतं आहेत.”