‘झी युवा वाहिनी’वरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचेली गंगा म्हणजे अभिनेत्री प्रणित हाटे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री प्रणित हाटे एका कार्यक्रमानिमित्ताने नाशिकमध्ये आहे. तिथं तिनं एका हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं. पण ती तृतीयपंथी असल्यामुळे तिचं हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आलं. हा संपूर्ण प्रसंग तिनं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केला आहे आणि यावर काय करता येईल? असा प्रश्न चाहत्यांना विचारताना प्रणित दिसत आहे.
हेही वाचा – Video: अभिनेता जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
ही घटना घडल्यानंतर प्रणितने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. हॉटेलचा फोटो शेअर करत तिनं लिहिलं, “एका कार्यक्रमानिमित्ताने मी आज नाशिकमध्ये आले असून तिथल्या एका हॉटेलमध्ये रुम बूक केली होती. पण अचानक रुम बुकिंग रद्द करण्यात आली. जेव्हा मी कारण विचारलं तर ते म्हणाले, तुम्ही तृतीयपंथी आहात. तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नाहीये. अशावेळी तृतीयपंथींनी कुठे जायचं?”
इन्स्टाग्राम स्टोरीनंतर प्रणित लाइव्ह आली आणि तिनं पुन्हा संताप व्यक्त केला. लाइव्हमध्ये अभिनेत्री म्हणाली, “मला माहित नाही कित्येक जणांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी पाहिली असेल. पण यावर काय करता येईल? ते मला कळावा. मी आता सध्या नाशिकमध्ये आहे. पूजा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आहे. मी इथं एका कार्यक्रमासाठी आले होते. नाशिकमध्ये माझा कार्यक्रम आहे. या हॉटेलमध्ये कालपासून बुकिंग केली होती. आज चेकिंगवेळी जेव्हा मी इथं आतामध्ये आले. माझे कागदपत्र वगैरे सगळं काही घेतलं आणि कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर सांगितलं की, तुमची बुकिंग रद्द करतोय. कारण तुम्ही तृतीयपंथी आहात.”
हेही वाचा – “होय, मी कपिल शर्मा शोची कॉपी केली…”, निलेश साबळेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “इंडस्ट्रीचा फायदा…”
“तर आता हा प्रश्न आहे, माझ्यासारखे अनेक तृतीयपंथी आहेत जे बाहेर कार्यक्रमासाठी किंवा कोणत्या कामानिमित्ताने बाहेर जातात. एक महत्त्वाचं सांगते आम्ही कुठलंही चुकीचं काम करायला आलो नाहीत. आम्ही वायफळ आणि घाणेरडं काम करायला आलो नाहीत. ज्याच्यामुळे हॉटेल बुकिंग रद्द केली जातेय. तर आम्हाला एवढंच कारण सांगितलं की, तुम्ही तृतीयपंथी आहात त्यामुळे तुमची बुकिंग रद्द केली. अशावेळी आम्ही कुठे जायचं? बुकिंग कुठे करायची. आता हॉटेलमध्ये लोगो लागणार आहेत का? किती हास्यास्पद आहे हे. आता आम्ही कार्यक्रमााठी तयार कुठे होणार? आराम कुठे करणार? या क्षणी काय करायला हवं? कुठे तक्रार दाखल केली पाहिजे? तृतीयपंथी आहोत म्हणून आम्हाला हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार नाही का? मी आजारी असते आणि खूप गरज असती तर काय केलं असतं?, असे अनेक प्रश्न अभिनेत्री प्रणितने उपस्थित केले आहेत.
अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “२०२४मध्ये देखील असं सुरू आहे, यावर विश्वास बसत नाही.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही मतदान करू शकता. पण तुम्हाला रुम मिळणार नाही? काय मुर्खपणा आहे.” याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला पोलिसात तक्रार करा, असा सल्ला दिला आहे.