‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’. या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील खलनायिकेची भूमिका म्हणजेच शनाया चांगलीच भाव खाऊन गेली. अभिनेत्री रसिका सुनीलने ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. रसिकाला शनाया भूमिकेसाठी ‘झी मराठी’चा सर्वोत्कृष्ट खलनायिकेच्या पुरस्कार मिळाला होता. अशी ही लोकप्रिय रसिका सुनील नुकतीच नवऱ्याच्या एका कृतीमुळे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
अभिनेत्री रसिका सुनील २०२१मध्ये आदित्य बिलागीशी लग्नबंधनात अडकली. काही वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अभिनेत्रीचं लग्न झाल्यापासून ती कधी अमेरिकेत तर कधी भारतात असते. कारण तिचा नवरा अमेरिकेतील एका कंपनीत कामाला आहे. पण, सध्या रसिका भारतात आणि आदित्य अमेरिकेत आहे.
आज रसिका ज्या श्वानाला भाऊ मानते त्या ‘रश’चा वाढदिवस आहेत. त्यानिमित्ताने आदित्यने ‘रश’ला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्यने ‘रश’सारखा बर्फाचा श्वान तयार केला, जो पाहताच रसिकाचे अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
रसिकाने आदित्यचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “आमच्या लहान बाळासाठी आमचं हे प्रेम अतुलनीय आहे. आदित्य हा व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना तुझी परवानगी घेतली नाही, यासाठी सॉरी. आज ‘रश’चा वाढदिवस आहे. ‘रश’ हे आमचं बाळ आहे.” रसिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, रसिका नेहमी ‘रश’बरोबरचे सुंदर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच अभिनेत्री रक्षाबंधन, भाऊबीज ‘रश’बरोबर साजरी करताना दिसते. रसिकाच्या ‘रश’ नावाच्या या श्वानाला आता चार वर्षे झाली आहेत.
रसिका सुनीलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ नाटकात पाहायला मिळत आहे. विजय केंकरे दिग्दर्शित ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ नाटकात रसिकासह अनिकेत विश्वासराव, गौतमी देशपांडे, प्रियदर्शन जाधव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या नाटकाला रंगभूमीवर सध्या प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.