बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ चित्रपटासह अनेक सिनेमे व लोकप्रिय टीव्ही शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसने काम केलं आहे. सध्या ती कलर्स मराठीवरील ‘अंतरपाट’ या मालिकेत विदुला नावाची महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आपल्या दमदार अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांना मनं जिंकणाऱ्या रेशमच्या खासगी आयुष्याबद्दल फार लोकांना माहित नाही. रेशमला दोन अपत्ये असून ती काय करतात, याबाबत रेशमने सांगितलं आहे.
रेशमने १९९३ मध्ये अभिनेता संजीव सेठशी लग्न केलं होतं. संजीवने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’सह इतर अनेक टीव्ही शोमध्ये काम केलंय. लग्नाच्या ११ वर्षानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. या जोडप्याला मानव नावाचा मुलगा आहे व रिशिका नावाची मुलगी आहे. घटस्फोटानंतर संजीवने २०१० मध्ये अभिनेत्री लता सभरवालशी लग्न केलं. रेशमच्या घटस्फोटाला २० वर्षे झाली आहेत आणि आता रेशमची मुलंही मोठी झाली आहेत, ती काय करतात ते जाणून घेऊयात.
“आता ते दोघं कामं करतायत, त्यांच्या आयुष्यात व्यग्र आहेत. त्यांना त्यांचे जोडीदार आहेत. त्यांना माझ्यासाठी वेळ नाही, त्यामुळे मी काम करून स्वतःला व्यग्र ठेवते. मानव व्हीएफक्स ग्राफिक्स डिझायनर आहे आणि रिशिका एका कंपनीमध्ये क्रिएटिव्ह हेड आहे आणि ती फोटोग्राफर आहे, तर फ्रीलान्स फोटोग्राफीही करते. ती जाहिराती शूट करते, जाहिरातींचं दिग्दर्शन करते, ती लिहिते, ती खूप क्रिएटिव्ह आहे,” असं रेशमने राजश्री मराठीशी बोलताना सांगितलं.
सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली आईची साडी, तर रिसेप्शनच्या लाल बनारसी साडीची किंमत फक्त…
मुलांना अभिनयक्षेत्राची आवड नसल्याचं रेशमने सांगितलं. “त्यांना या क्षेत्रात अजिबात रस नाही. ते माझं कामही बघत नाहीत. मी त्यांना म्हटलं की माझी मालिका बघितली का, तर ते हो बघतो बघतो असं म्हणतात,” असं रेशम टिपणीस म्हणाली.
रेशमने घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं नाही. पण ती संदेश किर्तीकरबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. रेशम संदेशबरोबरचे फोटो व व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. रेशमला एका मुलाखतीत दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा तिने पुन्हा लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “लग्नानंतर एकच बदल होईल की माझ्या गळ्यात मंगळसूत्र असेल, बाकी सर्व काही आता आहे तसंच राहील. संदेश आणि माझ्या नात्यामध्ये सर्व काही ठीक आहे. मला लग्न करून आमचं नातं खराब करायचं नाही” असं रेशमने म्हटलं होतं.