‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’चा काल शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. या मालिकेनं तब्बल ४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २०१९ पासून सुरू झालेल्या या मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. नवनवीन ट्विस्टमुळे या मालिकेनं प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. शिवाय या मालिकेतील पात्र देखील घराघरात पोहोचली होती. विशेष म्हणजे दीपा हे पात्र चांगलंच गाजलं. सुरुवातीला दीपाच्या वर्णावरून बरीच टीका झाली होती. पण नंतर या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदेने मालिकेविषयी केलेली भावुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
रेश्मा शिंदेने दीपाच्या रुपातील दोन फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहीलं आहे की, “येते हा..जाते नाही, येते म्हणावं नाही का?.. हा निरोप नाही तर पुन्हा नव्या रुपात येण्याची नांदी आहे, असं मी म्हणेन..या ना त्या वेगळ्या रुपात तुम्हाला नक्की भेटायला येईन. अशीच सकारात्मक ऊर्जा घेऊन.. कलर गया तो पैसा वापस…”
पुढे सगळ्यांचे आभार व्यक्त करत रेश्माने लिहीलं की, “धन्यवाद ‘स्टार प्रवाह’, सतीश राजवाडे, मोनिका रणदिवे, शमा सय्यद तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल… हर्षदा खानविलकर , आशुतोष गोखले तुमच्याशिवाय दीपा अपूर्णच…अतुल केतकर, अर्पणा केतकर, चंद्रकांत गायकवाड, अभिजीत गुरू तुमचे खूप धन्यवाद. माझ्याबरोबर दीपा तुम्ही सुद्धा जगलात. लेक सासरी जाते तेव्हा तिला लेकीप्रमाणाने तसंच प्रेम माया मला दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार या प्रवासात हात घट्ट धरून ठेवलात.. असेच आशीर्वाद राहू दे.. येते…”
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवर उशीरा कोण येतं? तेजश्री प्रधान म्हणाली, “ठाण्यावरून….”
हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मधील सायलीचा नणंदेबरोबर ‘बादल बरसा बिजुरी’वर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “पूर्णा आजी…”
दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या जागी आजपासून तेजश्री प्रधानची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेत तेजश्री व्यतिरिक्त राज हंचनाळे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.