अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी दैनंदिन जीवनातील गोष्टी, नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच रुपालीने एका अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून रुपालीने त्या अभिनेत्रीचं भरभरून कौतुक केलं आहे. रुपालीची ही पोस्टचं सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
नुकताच, १० एप्रिलला लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते या दोन दिग्गज कलाकारांची मजेदार जुगलबंदी पाहायला मिळत आहे. तसंच या चित्रपटात सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे हे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातील तनिष्काच्या कामाचं रुपालीने खूप कौतुक केलं आहे. यासाठीचं तिने खास पोस्ट लिहिली आहे.
तनिष्का विशे आणि सायली संजीव बरोबरचे फोटो शेअर करत रुपाली भोसलेने लिहिलं, “‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाच्या प्रीमियरला गेलो होतो, तेव्हाचा हा क्षण…खूप अभिमान आणि खूप कौतुक वाटलं. तनिष्का विशे तू चित्रपटात खूप गोड दिसली आहे आणि काम सुद्धा खूप छान केलं आहेस. संपूर्ण चित्रपटात तू जो लाइव्लीनेस आणलास आणि तोही कुठेही ओव्हर न करता कमाल कमाल…’जब वी मेट’चा पार्ट २ आला तर गीतसाठी तू करेक्ट आहेस, मला इतकी तू आवडलीस. चित्रपट संपल्यावर जेव्हा येऊन तुझं कौतुक करत होते ते बघून खरंच भारी वाटलं. छान, छान कामं करत राहा आणि खूप खूप मोठी हो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. खूप प्रेम. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो.”
दरम्यान, रुपाली भोसलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर रुपाली आता पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ‘शिट्टी वाजली रे’ या नव्या कुकिंग शोमध्ये रुपाली दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘शिट्टी वाजली रे’च्या प्रोमोमध्ये रुपालीची झळक झाली. या शोमध्ये रुपालीसह घनःश्याम दरवडे, स्मिता गोंदकर, पुष्कर श्रोत्री, गौतमी पाटील असे अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. २६ एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता ‘शिट्टी वाजली रे’ शो प्रसारित होणार आहे.