मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा तिच्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकारांनी देखील लाइक्सचा पाऊस पाडला आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी जमिनींना सोन्याचा भाव असतानाही स्वत:च्या हक्काचं घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ऋतुजाने हक्काच्या घराचं फक्त स्नप्नच पाहिलं नाही तर ते सत्यात देखील उतरवलं. तिच्या नवीन घराला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने ऋतुजाने तिच्या घराची सफर सोशल मीडियाच्या माध्यमातून करुन दिली आहे.
असं आहे ऋतुजाच्या घराचं इंटीरिअर
ऋतुजाने चाहत्यांना व्हिडीओमधून नव्या घराची झलक दाखवली आहे. दारावर फुलांच्या नक्षीने तयार केलेली नावाची पाटी आहे. त्यावर ऋतुजा प्रतिभा राजन बागवे असं तिचं पुर्ण नाव लिहिलेलं आहे. घरात प्रशस्त बैठकीची खोली आहे. त्याचबरोबर संपूर्ण घराला पांढऱ्या रंगांच इंटीरिअर केलेलं आहे. ऋतुजा अभिनेत्री असली तरी तिला चित्रकलेची आवड आहे. घराच्या एका भिंतीवर एक सुंदर पेंटिंग आहे. हे पेंटिंग मुंबईच्या जीवनशैलीचं प्रतिनिधित्व करतं. ऋतुजा मुळची मुंबईची असल्याने तिने एका भिंतीवर टॅक्सी आणि बेस्ट बस ट्रॅफिकमधून जात असतानाचं पेंटिंग हॉलमध्ये ठेवलं आहे.
हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाण मालिकेच्या सेटवर दिसला चिंच खाताना, पाहा व्हिडीओ
फर्निचर, ट्रॉली अशा आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं तिचं मॉर्डन किचन आहे. त्याशिवाय बेडरुमच्या दरवाजावर जंगलात उभ्या असलेल्या हरणाचं स्केच सुंदर दिसत आहे.बेडरुमच्या एका भिंतीवर ऋतुजाचं एक सुंदर स्केच अडकवण्यात आलं आहे. ऋतुजाला परंपेरेने आपल्याकडे आलेला वारसा जपण्यात आनंद मिळतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिच्या घरातली विठ्ठलाची मूर्ती. मूर्तीच्या मागील भिंतीवर ‘विठ्ठल’ असं केलेलं सुलेखन मनाला आनंद देतं. ऋतुजाच्या घरी असंख्य फूलझाडं आहेत. त्याबरोबरचं हॉलच्या भल्यामोठ्या बाल्कनीतून दिसणाऱ्या येऊर हिल्सची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.
काय म्हणाली ऋतुजा ?
घराचा रिल सोशल मीडियावर पोस्ट करत, “आपलं ते “स्वतः सजवलेलं, स्वतःचं घर” असं तिने कॅप्शन दिलंय. घराला एक वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल तिने घराच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. ऋतुजाबद्दल सांगायचं तर महाविद्यालयात असताना तिने नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. मात्र तिला खरी ओळख ‘अनन्या’ नाटकातील साकारलेल्या व्यक्तिरेखेने मिळवून दिली. सध्या ऋतुजा हिंदीतील ‘मातीसे बंधी डोर’ या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ऋतुजा ‘तू माझा सांगाती’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘नांदा सौख्य भरे’ अशा सदाबहार मालिकेतून झळकली होती. त्याचबरोबर ‘अथांग’ या मराठी वेबसीरिजमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं.