मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आजवर सईने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तिचा ‘अग्नि’ नावाचा नवा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ६ डिसेंबरला सईचा ‘अग्नि’ चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतिक गांधी, दिव्येंदु शर्मा, सैयामी खेर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. याशिवाय आजपासून ‘सोनी मराठी’वरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक!’ हे नवं पर्व सुरू होतं आहे. या नव्या पर्वात पुन्हा एकदा परीक्षक म्हणून सई पाहायला मिळणार आहे. अशातच सईने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील समीर चौघुले, सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचं तीन शब्दांत कौतुक केलं आहे.
नुकताच ‘सोनी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सईला काही प्रश्न विचारले आहेत. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सईला विचारलं की, तू नेहमी कॅरी करतेस अशा तीन गोष्टी कोणत्या? सई म्हणाली, “फोन, लिप बाम आणि घराच्या चाव्या.” त्यानंतर सईला विचारलं की, हास्यजत्रेच्या सेटवरील आवडत्या तीन गोष्टी कोणत्या? तर अभिनेत्री म्हणाली, “शेंगदाणे, माझी खुर्ची आणि सगळं.”
त्यानंतर तिला विचारलं की, समीर चौघुलेंचं तीन शब्दांत कसं वर्णन करशील? त्यावर सई म्हणाली, “नितळं, नैसर्गिक, जगात भारी.” पुढे सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्याविषयी तीन शब्दांत सांग, असं सईला सांगितला. तेव्हा ती म्हणाली, “सिल्व्हर हेडेड प्रिन्स विथ सुपीक जमीन.” तसंच शालुमालू, लॉली, शीतली-शंकऱ्या, लोचन मजनू आणि अरुण कदम यांनी केलेली कोणतीही भूमिका आवडतं असल्याचं सई ताम्हणकरने सांगितलं.
दरम्यान, सई ताम्हणकरच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटात दिसणार आहे. १ मे २०२५ रोजी सईचा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच याआधी सई ‘बोल बोल राणी’ या थ्रिलर चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर यांच्याबरोबर पाहायला मिळणार आहे. तिचा हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.