मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. सायलीने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. काही दिया परदेस या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत अढळ स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच सायली ही तिच्या आगामी हर हर महादेव या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दमदार आवाज लाभला आहे.
हर हर महादेव च्या निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी अभिनेत्री सायली संजीव, शरद केळकर, हार्दिक जोशी हे या बसच्या प्रवासात सहभागी झाले. त्यांना त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. बस बाई बस या कार्यक्रमातील एका खेळादरम्यान सायली संजीवने राज ठाकरेंशी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान तिला राज ठाकरेंचा फोटो दाखवण्यात आला. त्यावर तिने अरे बापरे… राजसाहेब ठाकरे असे म्हटले. त्यानंतर तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” सायली संजीवने ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडले
सायली संजीव काय म्हणाली?
“माननीय राज ठाकरे, सर्वात आधी जय महाराष्ट्र….! मी खूप मनापासून तुमचा आदर करते. तुमचे विचार मला खूप आवडतात. राज काका, आता ते कदाचित जगाला पटत नसतील, पण मला माहिती आहे की काही काळानंतर प्रत्येक जण हे म्हणेल की राजसाहेब जे म्हणतं होते ते बरोबर होतं.
एक राजकीय विश्लेषक म्हणूनही मला हेच वाटतं की तुम्ही आधी जे विचार मांडता ते काही काळानंतर खरे होतात. पण तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि मी तुम्हाला भेटू शकतेय, तुमच्याबरोबर काम करु शकते, याचा मला आनंद आहे. तुमच्याबरोबर असंच मला काम करत राहायचंय. तुमचा आशीर्वाद असू द्या. तुम्ही जसे आहात तसेच राहा. मला तुम्ही खूप आवडता”, असे सायली संजीवने यावेळी म्हटले.
आणखी वाचा : “मुलुख माझा, हुकूम माझा मग भाषा पण माझीच…” राज ठाकरेंचा दमदार आवाज असलेल्या चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
दरम्यान हर हर महादेव या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. तर ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी केली आहे. यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित होत आहे.