Sharmishtha Raut Desai Blessed With Baby Girl : सध्या अभिनयासह निर्मितीची धुरा उत्कृष्टरित्या सांभाळणाऱ्या शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला आहे. शर्मिष्ठा आई झाली असून तिनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यातील खास क्षण ‘राजश्री मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आई-बाबा झाल्यामुळे शर्मिष्ठा राऊत आणि नवरा तेजस देसाई खूप आनंदी दिसत आहेत.

अभिनेत्री, निर्माती शर्मिष्ठा राऊतचं लग्न लॉकडाऊनदम्यान ऑक्टोबर २०२०मध्ये झालं होतं. तेजस देसाईबरोबर तिनं लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर लग्नाच्या साडे चार वर्षांनंतर शर्मिष्ठा व तेजस आई-बाबा झाले आहेत. या आनंदाच्या बातमीमुळे शर्मिष्ठाच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

लाडक्या लेकीच्या नामकरण सोहळ्यात शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई खास मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळाले. पांढऱ्या आणि लाल रंगाच्या नऊवारी साडीत शर्मिष्ठा दिसली. तर तेजसनं बायकोला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा कुर्ता, धोती, ज्यावर पैठणीचं लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं. दोघं या मराठमोळ्या पेहरावात खूप सुंदर दिसत होते.

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं साकारलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतील नीरिजा, ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील प्रेमळ पण पटकन चिडणारी अर्चना, ‘उंच माझा झोका’ मधली आलवणातली ताई काकू, ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली संध्या ही पात्र अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. ‘बिग बॉस मराठी’मध्ये तिची वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री झाली होती आणि त्यानंतर जबरदस्त खेळानं तिनं प्रेक्षकांची मनं जिकलं. ‘फु बाई फू’ मधून तिनं आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं. सध्या तिची निर्मिती असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांना प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय शर्मिष्ठा चित्रपट निर्मितीही करताना दिसत आहे. या निर्मितीमध्ये तिच्याबरोबर तेजस जोडीला आहे.