‘कॉमेडी क्वीन’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांना खळखळवून हसवते. श्रेयाने नवरात्री निमित्ताने तिच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत.
मराठी मुलगी असणारी श्रेया बुगडे खऱ्या आयुष्यात एका गुजराती कुटुंबाची सून आहे. श्रेयाने निर्माता असणाऱ्या निखिल सेठसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांची पहिली भेट एका मालिकेच्या सेटवर झाली होती. नुकतंच श्रेयाने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने नवरात्र आणि गुजराती संस्कृतीबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
“श्रेया बुगडे शेठ असं जर माझं आडनाव असलं तरी आम्ही कोकणातील आहोत. त्यामुळे आमच्याकडे गुजराती वातावरण नाही. ते जरी गुजराती असले तरी आमच्या घरातील सर्व पाळंमुळं ही कोकणातील आहेत. आमच्या घरीही मराठीतच बोललं जातं. खाण्यापिण्याच्याही सर्व सवयी या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या आहेत. त्यामुळे आडनावाने फक्त शेठ लागतं”, असे श्रेया बुगडेने म्हटले.
“पण माझं गुजराती संस्कृतीशी खूप घट्ट नातं आहे. मी गुजराती कर्मशिअल थिएटरमध्ये काम करायचे. त्यामुळे माझे खूप मित्र-मंडळी हे गुजराती आहेत. त्याबरोबरच मी बोरिवलीत लहानाची मोठी झाले आहे. नवरात्रीत बोरिवलीचा एक वेगळा चेहरा पाहायला मिळतो. त्यामुळे मी ते सर्व अनुभवलेलं आहे. माझे अनेक जवळचे मित्र हे गुजराती मारवाडीच आहेत. त्यामुळे मी त्या संस्कृतीशी स्वत:ला फार रिलेट करते”, असेही श्रेया बुगडेने सांगितले.
दरम्यान श्रेया बुगडे ही शाळेत असल्यापासून अभिनय करायची. तिला ‘फू बाई फू’ या कार्यक्रमामुळे संधी मिळाली. तिने या मंचावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर तिला ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली.