सध्या बरेच मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमल इंगळे, कौमुदी वलोकर, अभिषेक गावकर, रेश्मा शिंदे, किरण गायकवाड या कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आता लवकरच मराठी मालिकाविश्वातील दोन लोकप्रिय चेहरे शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे बोहल्यावर चढणार आहेत. लग्नाआधीच्या विधीचे फोटो समोर आले आहेत.
‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजीवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार ‘रंग माझा वेगळा’ फेम अंबर गणपुळेशी लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी शिवानीने लग्नासाठी खास पणजीची नथ पुन्हा गाठवून घेतली. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर आता लग्नाआधीच्या विधीचे फोटो शिवानीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
हेही वाचा – रिचा चड्ढा-अली फैजल चिमुकल्या लेकीशी ‘असा’ साधतात संवाद, तिच्यासाठी गातात ‘हे’ गाणं
शिवानी सोनारने काही तासांपूर्वी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर तिने लिहिलं होतं की, नवरी होण्यास तयार. या फोटोमध्ये शिवानी ऑफ व्हाइट रंगाची साडी, नाकात नथ, कपाळावर टिकली या लूकमध्ये दिसली. नुकताच तिने अजून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये जातं, पाटा-वरंवटा, खलबत्ता याची पूजा केलेली पाहायला मिळत आहे. शिवानीने शेअर केलेल्या याच फोटोवरून लग्नाआधीच्या विधीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच आता शिवानी गणपुळेंची सून होणार आहे.
दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ९ एप्रिल २०२४ला शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. कुठलाही गाजावाजा न करताना शिवानी व अंबरने गुपचूप साखरपुडा उरकला होता. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. साखरपुड्याच्या नऊ महिन्यांनंतर शिवानी व अंबर आता लग्नबंधनात अडकणार आहेत.
शिवानी-अंबरची लव्हस्टोरी
एका मुलाखतीमध्ये शिवानीने लव्हस्टोरी सांगितली होती. ती म्हणाली होती, “आम्ही दोघं एकमेकांना भेटणं हे अनपेक्षित होतं. कारण आम्ही दोन्ही टोकाची दोन माणसं आहोत. मी खूप वेगळी आहे आणि तो खूप वेगळा आहे. तो त्याचा शो संपवून पुण्यात आला होता. तो पुण्याचाच आहे. तर त्यावेळेस मी माझा शो संपवून पुण्यात आले होते आणि आम्ही एकमेकांना ओळखत होतो. कारण कधी नाटकाच्या प्रयोगाला भेटलो होतो तर कधी कोणाच्या लग्नात भेटलो होतो. एवढीच ओळख होती. काही मैत्री वगैरे नव्हती. त्या १५ दिवसांत असं झालं की, आमचा एक कॉमन मित्र आहे. जो माझा चांगला मित्र आहे पराग. त्याला एक शॉर्ट फिल्म करायची होती. त्याच्या खूप दिवसांपासून डोक्यात होतं की, आम्हा दोघांना कपल म्हणून कास्ट करायचं.
“आम्ही त्याच्यासाठी भेटलो. त्याचं वाचन, रिहर्सल या सगळ्यासाठी भेटलो. पण काही कारणास्तव ती शॉर्ट फिल्म पूर्ण झाली नाही. पण आमची फिल्म वर्क झाली. नंतर मग पुढे सगळंच झालं. त्याने मला विचारलं, काय तुझे विचार आहेत नक्की. काय झोन आहे आणि मग सगळं झालं”, असं शिवानीने म्हणाली होती.