Shivani Sonar Haldi Ceremony : ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच बोहल्यावर चढणार आहे. उद्या, २१ जानेवारीला शिवानी अभिनेता अंबर गणपुळेशी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या लग्नाआधीचे विधी पाहायला मिळत आहेत. आज शिवानीला हळद लागली आहे. याचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.
५ जानेवारीपासून शिवानी सोनारच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली. त्यानंतर अष्टवर, मेहंदी, संगीत हे समारंभ पार पडले. सध्या शिवानीच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ खूप व्हायरल झाले आहेत. या संगीत सोहळ्यात शिवानीने होणारा नवरा, आई, वडील यांच्याबरोबर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळत आहेत. आज शिवानीला अंबरची उष्टी हळद लागली आहे. हळदीसाठी शिवानीने खास लूक केला होता. तिने पिवळी फुलं असलेली पांढरी साडी नेसली होती. ज्यावर तिने मोत्यांच्या माळा आणि केसात गजरा माळला होता. या लूकमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसत आहे.
हळदीच्या समारंभातही शिवानी सोनारचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला. अजय-अतुलचं लोकप्रिय गाणं ‘ब्रिंग इट ऑन’वर शिवानी थिरकताना दिसत आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीच्या शेअर करण्यात आला आहे.
शिवानीच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल थोडक्यात माहिती…
शिवानी सोनारचा होणारा नवरा ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेला आदित्य प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. त्यानंतर अंबर ‘लोकमान्य’ मालिकेत झळकला. त्याची ही मालिका अवघ्या काही महिन्यात बंद झाली. मग तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळाला. पण त्याच्या याही मालिकेला फारस यश लाभलं नाही.
दरम्यान, शिवानी सोनारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेनंतर तिने ‘सिंधुताई माझी माई’मध्ये काम केलं. या मालिकेत तिने मोठ्या सिंधुताई सपकाळांची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिची ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत शिवानी सुबोध भावेबरोबर प्रमुख भूमिकेत झळकली. पण, पाच महिन्यांनी शिवानीच्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.