गेल्या वर्षा अखेरीस बऱ्याच मराठी कलाकार मंडळींनी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अभिनेत्री रेश्मा शिंदे, किरण गायकवाड, अभिषेक गावकर, कौमुदी वलोकर, हेमल इंगळे या कलाकारांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पाहायला मिळाला. त्यानंतर आता मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबरला हळद लागली. त्यानंतर आता शिवानीलादेखील उष्टी हळद लागली आहे. याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत.
अभिनेता अंबर गणपुळेला १८ जानेवारीला हळद लागली. त्यानंतर संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यात अंबर-शिवानीने जबरदस्त डान्स केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज शिवानीला हळद लागली आहे. याचे फोटो शिवानीच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आले आहेत. हळदीच्या समारंभातील शिवानीने केलेल्या सुंदर लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हळदीसाठी शिवानी सोनारने खास पांढऱ्या रंगाचा लूक केला होता. तिने पिवळी फुलं असलेली पांढरी साडी नेसली होती. ज्यावर तिने मोत्यांच्या माळा आणि केसात गजरा माळला होता. तिचा हा साधा लूक चाहत्यांना खूपच आवडला.
दरम्यान, शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे उद्या, २१ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर, शिवानी आणि अंबरची पहिली भेट पुण्यात झाली होती. शिवानी पुण्यात असताना अंबर सतत तिला कधी नाटकाच्या प्रयोगाला तर कधी कोणाच्या तरी लग्नात भेटायचा. पण, यावेळी दोघांची मैत्री नव्हती. मात्र या दिवसांत दोघांच्या एका कॉमन मित्राला एक शॉर्ट फिल्म करायची होती. त्या मित्राला अंबर आणि शिवानीलाच एकत्र घेऊनच शॉर्ट फिल्म करायची होती. याच शॉर्टफिल्मच्या वेळी अंबर आणि शिवानी एकमेकांच्या चांगले मित्र झाले. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर दोघं संसार थाटण्यासाठी तयार झाले आहेत.