‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजीवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ या मालिकेत झळकलेला अभिनेता अंबर गणपुळेशी शिवानी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या दोघांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. शिवानी लग्नात पणजीची नथ घालणार आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री शिवानी सोनारचा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ९ एप्रिलला अंबर गणपुळेशी साखरपुडा झाला होता. कुठलाही गाजावाजा न करताना शिवानी व अंबरने गुपचूप साखरपुडा उरकला होता. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. साखरपुड्याच्या सात महिन्यांनंतर शिवानी व अंबर आता लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नासाठी खास शिवानीने आपल्या पणजीची नथ पुन्हा नव्याने बनवून घेतली आहे. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत शिवानी सोनारने लिहिलं, “दागिने ही स्त्रीच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची गोष्ट आणि एखादा दागिना घडवतं असताना तो पाहणं याच्या सारखं दुसरं सुख नाही…त्यात नथ म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय…पण ही नथ माझ्यासाठी जास्त खास आहे…कारण ही नथ माझ्या आजीच्या आईची…तिने तिच्या लग्नात घातली… मग माझ्या आजीने तिच्या लग्नात… आणि आता मी माझ्या लग्नात ही नथ घालणार…थोडी जुनी झाली होती त्यामुळे नव्याने विणून घ्यावी लागली.”
“आडनाव सोनार असलं तरी आजपर्यंत दागिना घडताना पाहिलं नव्हतं… यानिमित्ताने तेही पूर्ण झालं…माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल दागिना आहे हा…कारण अंकईकर आजोबांनी खूप प्रेमाने विणलेली नथ आहे ही…यात पणजी आजीचे आणि माझ्या आजीचे आशीर्वाद आहेत…आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही नथ घडत असताना आई ज्या अभिमानाने माझ्याकडे बघत होती… ती नजर मी कधीच नाही विसरू शकणार…आई माझ्याकडे अशी बघत होती जणू तिला कोणीतरी बेस्ट आई असं अवॉर्ड दिलंय…बाकी…जुने आणि पारंपरिक दागिने घालून मिरवायची मजा काहीतरी वेगळीच आहे,” अशी सुंदर पोस्ट शिवानी सोनारने लिहिली आहे.
हेही वाचा – ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्याची आईच्या उपचारासाठी मदतीची हाक, म्हणाला, “गेले तीन महिने…”
दरम्यान, शिवानी सोनारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेनंतर तिने ‘सिंधुताई माझी माई’मध्ये काम केलं. या मालिकेत तिने मोठ्या सिंधुताई सपकाळांची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिची ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत शिवानी सुबोध भावेबरोबर प्रमुख भूमिकेत झळकली. पण, पाच महिन्यांनी शिवानीच्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.