‘चला हवा येऊ द्या’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामुळे अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरांत लोकप्रिय झाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रेयाने महाराष्ट्रभरात दौरे केले. आता लवकरच श्रेया ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘ड्रामा Juniors’ या नव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
श्रेया बुगडे ‘ड्रामा Juniors’ कार्यक्रमात सूत्रसंचालिकेची जबाबदारी निभावणार आहे. तर या कार्यक्रमात परीक्षक म्हणून संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर जबाबदारी सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाचा पहिला भाग आज ( २२ जून ) प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या नव्या कार्यक्रमाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. यासंदर्भात श्रेया बुगडेने एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय तिने एक खास किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
श्रेया बुगडेची पोस्ट
खरंतर २७ वर्षांपूर्वी मी बालकलाकार म्हणून या मनोरंजन क्षेत्रात आले आणि इथेच रमले. साधारण २१ वर्षांपूर्वी ‘तुझ्याविना’ या मालिकेच्या निमित्ताने मी ‘झी’ परिवारात सामील झाले आणि टीव्हीचा उंबरठा ओलांडून तुमच्या घरात आले. तेव्हापासूनच आपलं एक वेगळं नातं आहे. नातं आपुलकीचं, प्रेमाचं आणि जबाबदारीचं…
होय जबाबदारीचं सुद्धा… कारण सांगते!
एकदा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एक काकू सहज बोलता-बोलता म्हणाल्या “मला जर मुलगी झालीना तर तिचं नाव मी ‘श्रेयाच’ ठेवेन. तुझ्यासारखीच होऊदे पोर माझी मला एवढं ‘धस्स’ झालं होतं त्या दिवशी, बापरे!
पुढे, त्या काकूंना ‘श्रेया’ झाली की ‘श्रेयस’ ते काही मला कळलं नाही. पण, माझी मात्र जबाबदारी वाढली कारण अशाच काही काकू, काका, दादा, ताईंची चिमुरडी घेऊन पुन्हा एकदा टीव्हीचा उंबरठा ओलांडून मी तुमच्या घरी येतेय !! आजपासून सुरु होणाऱ्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोचं सूत्रसंचालन मी करणार आहे. पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करणार आहे.
‘झी मराठी’ आणि मी आमच्या या जोडीला तुम्ही कायम खूप प्रेम आणि यश दिलंत, या नवीन प्रवासात आमच्याबरोबर जोडलेल्या सगळ्यांना पण तसंच भरभरून प्रेम द्याल याची खात्री आहे.
आजपासून आम्ही येतोय आमच्या गँगबरोबर…
भेटू मग आज आणि उद्या रात्री ९-१० वाजता
दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या नव्या कार्यक्रमाची घोषणा गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या कार्यक्रमासाठी विविध शहरातून लहान मुलांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. यामधून मुलांची निवड करण्यात आली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.
© IE Online Media Services (P) Ltd