मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक मालिका अचानक ऑफ एअर होताना दिसत आहेत. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील दोन मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अभिनेता अजिंक्य राऊत आणि जान्हवी तांबट यांची प्रमुख भूमिका असलेली ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका बंद झाली आहे. याबरोबर तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या श्रुती मराठेच्या ‘भूमिकन्या’ मालिकेनेही प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यानिमित्ताने ‘भूमिकन्या’ मालिकेतील अभिनेत्याने भावुक पोस्ट लिहिली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेत्री श्रुती मराठे व तिचा पती, अभिनेता गौरव घाटणेकर यांची निर्मिती असलेली ‘भूमिकन्या’ १० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता आनंद अलकुंटे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तसंच काही दिवसांनंतर गौरव घाटणेकरची देखील यात एन्ट्री झाली. मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पण अचानक अवघ्या ९३वं भागात ‘भूमिकन्या’ बंद करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील अभिनेता मिलिंद अधिकारीने सुंदर पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा – Wildcard संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसांत घराबाहेर! ‘हे’ आहे कारण; नेटकरी म्हणाले, “अरबाजला वाचवायला…”
अभिनेता मिलिंद अधिकारीने लिहिलं आहे, “दीर्घकाळ मालिका चालण्याच्या काळात एखादी मालिका मोजक्याच भागात संपली तर…तर लागणारी हुरहूर अत्यंत वेदनादायी असते…कारण मालिकेच्या माध्यमातून बरंच काही दाखवायचं ठरलेलं असतं आणि सगळंच राहून गेलेलं असतं, आत्ता कुठे प्रवास सुरू झालेला असतो, कलाकार तंत्रज्ञांमधे एक नातं निर्माण व्हायला सुरुवात होत असते, काही कलाकारांची ती पहिलीच मालिका असते, त्यात प्रेक्षकांचे येणारे संमिश्र प्रतिसाद हुरूप वाढवत असतात, बळ देत असतात आणि अचानक मालिकेचा प्रवास थांबतो…अगदी असंच घडलंय…”
अभिनेत्याने पुढे लिहिलं, “नव्यानेच सुरू झालेली ‘भूमिकन्या’ या आमच्या मालिकेने अवघ्या ९३वं भागात प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे..अगदी कायमचा…आनंद या गोष्टीचा आहे की या मालिकेलाही प्रेक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने थोड्याफार प्रमाणात निसर्गाशी एकरूप होता आलं ही सुद्धा जमेचीच बाजू. फक्त आमच्याकडून ठरवलेलं असूनही वेळेअभावी प्रेक्षकांना वेगळं काहीतरी द्यायचं मात्र राहूनच गेलं याचं तीव्र दुःख आहे.”
“व्यक्तिशः माझा या मालिकेसाठी ॲाडिशन देण्यापासून सुरू झालेला भूमिकेचा मानसिक प्रवास अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन थांबवावा लागला याचं जरा जास्त वाईट वाटतंय. तशा याआधीही मला नकारात्मक भूमिका साकारायला मिळाल्या पण ‘हैबतराव घोरपडे’ एन्ट्रीपासूनच त्या सगळ्यांच्या वर होता… हैबत…तुझी नेहमी आठवण येईल. ही भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी सोनी मराठी, ब्लॅक कॉफी प्रोडक्शनचे निर्माते श्रुती मराठे, गौरव घाटणेकर यांचे आभार. तसंच दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक, क्रिएटीव्ह टीम, सर्व सहकलाकार, डीओपी, पडद्यामागचे कलाकार इतरही सर्व तंत्रज्ञांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांचे मनापासून आभार,” असं मिलिंद अधिकारीने लिहिलं आहे.
दरम्यान, याआधीही ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील बऱ्याच मालिका अचानक ऑफ एअर झाल्या होत्या. वर्षही पूर्ण न होता अभिनेता सिद्धार्थ खिरीड व अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांची प्रमुख असलेली ‘राणी मी होणार’ ही मालिका बंद झाली होती. तसंच ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ या मालिकेने देखील अवघ्या तीन महिन्यात गाशा गुंडाळला होता.