‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व हे सध्या सातत्याने चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वी बिग बॉसच्या घरात राखी सावंत आणि आरोह वेलणकर यांनी एंट्री घेतली. त्यामुळे घरातील स्पर्धकांचे धाबे दणाणले होते. बिग बॉसच्या घरातून रविवारी एका स्पर्धकाला निरोप घ्यावा लागला. अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. यावेळी ती भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही मराठी मालिकांमुळे घराघरांत पोहोचली. स्नेहलताने बिग बॉसची पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात एंट्री घेतली. यानंतर ती कायमच चर्चेत होती. काल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ती सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. स्नेहलता वसईकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहे.
आणखी वाचा : ऐतिहासिक पात्र, बोल्ड फोटो अन् रोखठोक स्वभाव असलेल्या स्नेहलता वसईकरबद्दल माहितीये का?
स्नेहलताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर तिने धन्यवाद असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. तुमच्या सगळ्यांचा प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद, असे तिने याला कॅप्शन देताना म्हटले आहे.
“बिग बॉसचं घर असो किंवा माझा कुठलाही नवा प्रवास तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून जे प्रेम सातत्याने करत आहात त्यासाठी मनापासून आभार ! बिग बॉसचा प्रवास इथेच संपला असला तरी नव्या वर्षात नवीन भूमिकेत भेटूच… तुमचं हे प्रेम, खंबीर पाठिंबा कायम राहू दे ! तुमचीच स्नेहलता…”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान स्नेहलता वसईकर ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मराठी मालिकांमुळे ती घराघरांत पोहचली. तिचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. आजही तिला याच भूमिकेमुळे प्रेक्षक ओळखतात. ऐतिहासिक भूमिका साकारत असतानाही अनेकदा बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली. या लूकमुळे तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागला. मात्र त्यावर तिने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची तोंड बंद केली होती.