‘तारक मेहता का उल्टा चश्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत विविधता असलेली, वेगळी स्टाईल असलेली, त्यांच्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी पात्रे दिसतात. या मालिकेतील जेठालाल गडापासून ते अय्यरपर्यंत सर्वच भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. आता या मालिकेतील भिडेमास्तर व माधवी ही जोडीदेखील प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन करताना दिसते. ही जोडी मराठी असल्याचे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे मराठी भूमिका साकारणारे हे कलाकार हे मराठी आहेत. आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका मंदार चांदवडेकर यांनी साकारली आहे; तर माधवी भिडे ही भूमिका सोनालिका जोशी(Sonalika Joshi)ने साकारली आहे. आता एका मुलाखतीत सोनालिका जोशीने शूटिंगदरम्याची एक घटना सांगितली आहे.

“मी पैठणी नेसून…”

अभिनेत्री सोनालिका जोशीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करिअरविषयी वक्तव्य केले. त्याबरोबरच तिला तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका कशी मिळाली याबद्दल खुलासा केला. सोनालिका जोशी म्हणाली, “शैलेश दातारमुळे मला तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मिळाली. तो या मालिकेच्या ऑडिशनसाठी गेला होता; पण त्याच्या शूटिंगच्या तारखांची समस्या होती. कारण- त्याचं आधीच दुसऱ्या हिंदी मालिकेसाठी बोलणं झालं होतं.

“तारक मेहता ही डेली सोप असल्यामुळे ते अॅडजस्ट करायला तयार नव्हते. तर त्यानं मला या माधवी भाभीच्या पात्रासाठी ऑडिशन द्यायला सांगितलं होतं. तेव्हा माझी मुलगी चार-पाच वर्षांची होती. तिला घरी ठेवून जायला लागायचं म्हणून मी ऑडिशन देणं टाळायचे. पण, मला शैलेशनं सुचवल्यामुळे आणि कांदिवलीमध्ये ऑडिशन असल्याने मी तेथे गेले. मला शैलेशनं सांगितलं होतं की मराठी पात्र आहे. तिथे ऑडिशनसाठी मी पैठणी नेसून गेले. तो जो निर्माता होता, तोदेखील तिथे होता. दिग्दर्शक गुजराती होते; पण त्यांना मराठीची माहिती होती. त्यांना माझं मालिकेतील काम माहीत होतं. निर्मात्यांनी मला येताना पाहिलं. त्यांच्या डोक्यात त्या पात्राची कल्पना होती. ती समोर येताना त्यांना दिसली. माझा महाराष्ट्रीयन लूक पाहून ते खूशच झाले. मला तिथेच त्यांनी सिलेक्ट करून टाकलं होतं.”

पुढे सोनालिका जोशी म्हणाली, “मी आतापर्यंत जी काही कामं केली, ती स्वत:च्या बळावर केली. इथे मला कोणीही गाईड करणारं नव्हतं. मला कोणी गॉडफादर नाही. मी कोणाची मदत घेतली नाही. कारण- मला आधी तसे अनुभव आले होते. इथली काही माणसं डोक्यात काहीतरी जाणीवपूर्वक उद्देश ठेवून बोलतात. हा मला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अनुभव आला. जेव्हा मी ‘सराय की मालकीन’मध्ये काम करीत होते. तेव्हा मी १७-१८ वर्षांची होते. पृथ्वी थिएटरमध्ये ते नाटक सुरू होतं. मी त्या नाटकामध्ये मी एन्ट्री घेत होते आणि ४० वर्षांच्या माणसानं मला प्रपोज केलं होतं. असे अनुभव आले. तेव्हापासून प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही ना काही घडतच होतं. म्हणून मी म्हटलं की, एक सीमारेषा आखणं गरजेचं आहे. त्यातून मी खूप गोष्टी शिकले. मी खालच्या थराला गेले नाही. मी माझा मार्ग निवडला. माझा आत्मसन्मान जपला आणि मी पुढे गेले. मी जे काम केलं, ते मनापासून केलं.”