मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) फलाट क्रमांक १० व ११च्या विस्तृतिकरणाचे काम हाती घेतलं आहे आणि ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच व सहाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून ते २ जूनपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आहे. पण मध्य रेल्वेच्या या मेगाब्लॉकचा मोठा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे. ठाणे, मुलुंड, ऐरोली येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोडींला अभिनेत्री सुप्रिया पाठारे देखील त्रस्त झाल्या.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या ‘साधी माणसं’ मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी नुकताच इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी वाहतूक कोंडी झाल्यामुळे झालेल्या त्रासाचा अनुभव सांगितला आहे. त्यांना ठाणे ते मढला जाण्यासाठी तब्बल पाच तास लागले आहेत. त्यामुळे त्यांनी लोकांना महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा असं आवाहन केलं आहे.
सुप्रिया पाठारे व्हिडीओत म्हणाल्या, “नमस्कार मी सुप्रिया पाठारे, माझं शूटिंग मढला असतं. मी आता ठाण्यावरून सकाळी आठ वाजता निघाले आणि आता साडे बारा झालेत. तरी अजूनही मी मढला पोहोचलेली नाही. प्रवासात मला पाच तास होऊन गेलेले आहेत. घोडबंदर रोड पूर्णपणे जाम आहे. एक-एक तास गाड्या एका जागी थांबवून ठेवत आहेत आणि मुलूंड-ऐरोलीच्या ब्रीजच्या इथे कुठेतरी कंटेनर पलटी झालाय म्हणून तिथेही वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर प्लीज घराबाहेर पडू नका कारण खाण्या-पिण्याचे खूप हाल होतायत आणि दुसरी गोष्ट नाटकवाल्यांसाठी त्यांचा प्रयोग असेल चार किंवा साडे चारला तर त्यांनी प्लीज वेळेत निघा. कारण खूप वाहतूक कोंडी आहे सगळीकडून तर तुम्ही अडकायला नको म्हणून…धन्यवाद.”
हेही वाचा – ‘बिग बॉस १६’ विजेता रॅपर MC Stanला झालंय तरी काय? आधी केली देवाकडे मृत्यूसाठी प्रार्थना आता म्हणतोय…
सुप्रिया पाठारेंच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच काही जणांनी वाहतूक कोडींमधला आपला देखील अनुभव सांगितला आहे.