गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी जल्लोषात गणरायाचं स्वागत करण्यात आलं. कोणी ढोल ताशे वाजवत, कोणी गणपतीची गाणी वाजवत गणपती बाप्पाला त्याच्या आसनावर विराजमान केलं. अशातच एका गोष्टीमुळे एक लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री सुरभी भावे तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. तर ‘स्वामिनी’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या कामाबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतेच पण याबरोबरच समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि तिला खटकणाऱ्या गोष्टींबद्दलही परखडपणे भाष्य करताना दिसते. तर आता तिने गणेशोत्सवाबद्दल केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना सुरभीला एक गोष्ट खूप खटकली आणि ती तिने सोशल मीडियावरून शेअर केली आहे. तिने स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “गणपती बाप्पा समोर आत्ता “आला बाबुराव” हे गाणं ऐकलं आणि माझ्यातली भक्त जागी होण्याआधीच लोप पावली. का हे गाणं वाजवावं वाटलं असेल ?? गाण्याचा आणि बाप्पाचा काय संबंध ?” तर आता तिच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं असून त्यावर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.