‘या रावजी बसा भावजी’ ही लावणी ऐकली तरी डोळ्यासमोर पटकन सुरेखा कुडची यांचं नाव येतं. आजवर असंख्य चित्रपट, टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकांमधून त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनमध्येही सुरेखा सहभागी झाल्या होत्या. सोशल मीडियावर त्या कायम सक्रिय असतात. अनेक सामाजिक विषयांवर त्या आपली स्पष्ट मतं मांडताना दिसतात. नुकतीच अभिनेत्रीने ‘राजश्री मराठी’च्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी संघर्षाच्या काळातील धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
सुरेखा कुडची यांना संघर्षाच्या काळाबद्दल विचारलं असता, त्यांनी इंडस्ट्रीत सुरुवातीच्या दिवसात आलेला भयंकर अनुभव सांगितला आहे. अभिनेत्री म्हणाल्या, “मी सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत आले, तेव्हा मला इथलं काहीच माहिती नव्हतं. मी आता जो अनुभव सांगतेय, त्यातून नवीन मुलींनी बोध घेण्यासारखं खूप आहे. तेव्हा, आराम नगरच्या भागात अनेक ऑफिसेस होती आणि मी तिथे ऑडिशनसाठी जायचं ठरवलं. त्यातल्या एका ऑफिसमध्ये भूताच्या चित्रपटांची पोस्टर्स लावली होती. त्या फिल्म्स सी ग्रेड होत्या. आता इंडस्ट्रीत नवीन असल्याने मला तेव्हा ‘ए ग्रेड’, ‘सी ग्रेड’ असं काहीच माहिती नव्हतं. त्या चित्रपटात काम करणारे तीन-एक जण ओळखीचे होते. त्यामुळे मला वाटलं मी योग्य ठिकाणी आले आहे.”
सुरेखा पुढे म्हणाल्या, “मी त्यांना जाऊन भेटले. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला लीड रोल ( मुख्य अभिनेत्री ) देतोय पण, तुम्ही आम्हाला काय देणार? सुरुवातीच्या काळात हा असा धक्कादायक अनुभव मला आला होता. पण, त्यानंतर मला असं विचारण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही, आता तर माझ्या वाट्याला पण कोणी येणार नाही. पण, तेव्हा मी इंडस्ट्रीत अगदीच नवीन होते, तेव्हा हा असा अनुभव मला आला होता.”
“तुम्ही आम्हाला काय देणार? याचा अर्थ मला वाटला आपण याला पैसे द्यायचे मग, हा आपल्याला भूमिका देणार… मी म्हटलं पैसे वगैरे नाहीयेत माझ्याकडे, मला फक्त काम करायचं आहे. तुम्ही सुद्धा मला कामाचे पैसे देऊ नका. मी फुकट काम करते. त्याला समजलं की, मला त्याच्या बोलण्याचा उद्देश समजलेला नाही. मग, त्याने मला जरा नीट सांगितलं. तो म्हणाला, तुम्हाला कळत नाहीये… बघा आम्ही तुम्हाला एवढी मोठी भूमिका देतोय तर, तुम्ही सुद्धा मला खूश करा. ‘तुम्ही एका रात्रीचे किती पैसे घेणार?’ असा थेट प्रश्न मला विचारला. पण, तरी सुद्धा मला काहीच समजलं नाही. शेवटी त्याने थेट जे आहे ते विचारलं. मी खरंच खूप घाबरले, माझ्या हृदयाचे ठोके वाढले. काही करून इथून मला पळायचंय असं मनात येत होतं. त्या माणसासमोर माझ्या फोटोंचा अल्बम होता तो पटकन मी उचलला आणि बाहेर पळून आले.” असं सुरेखा कुडची यांनी सांगितलं.
त्या घटनेनंतर पुन्हा इंडस्ट्रीतील प्रवास कसा सुरू केला याबद्दल अभिनेत्री पुढे सांगतात, “त्या घटनेनंतर बाहेर आल्यावर मी इतकी रडले…मला असं वाटलं खरंच आपल्याला हे सगळं करण्याची गरज आहे का? आपण खरंच काम करुया का की नको? यापेक्षा मी बाबांना सांगते माझं लग्न लावा असे अनेक प्रश्न मनात सुरू होते. कारण, मी हे सहनच करू शकत नव्हते. शेवटी, मग मला एकाने जयश्री बाईंना भेटायला सांगितलं. त्या बाई असल्याने मी त्यांना भेटायला गेले आणि तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.”