‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच स्वानंदीने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. तिने प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीबरोबरचे फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर आता स्वानंदीने साखरपुड्याबद्दलची घोषणा केली आहे.
स्वानंदीने नुकतंच फेसबुकवर एक छान फोटो शेअर केला आहे. यात स्वानंदी आनंदात पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच तिच्या हातावर छान मेहंदी काढल्याचे दिसत आहे तर तिचा होणारा नवरा आशिष तिच्या गालावर किस करताना दिसत आहे. यावेळी स्वानंदी आणि आशिषने छान ट्रेडिशनल आऊटफिट परिधान केला आहे.
आणखी वाचा : “आमचं ठरलं”, स्वानंदी टिकेकरने प्रेमाची कबुली दिल्यानंतर वडिलांची कमेंट, म्हणाले…
या फोटोला तिने रोमँटिक कॅप्शन दिले आहे. “आम्हाला जे हवे होतं तेच…”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. याबरोबरच तिने #EngagementMehendi #SwanandiAshish असे हॅशटॅगही दिले आहेत.
स्वानंदीने काल (२० जुलै) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने गायक आशिष कुलकर्णीबरोबर फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना तिने आमच्या दोघांचं ठरलं, असे कॅप्शन दिले होते. त्याबरोबर तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला होता. तिच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर स्वानंदी लगेचच साखरपुड्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यात तिने मिनल हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकांमध्येही झळकली होती.
स्वानंदी ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच गायिका देखील आहे. ती सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या पर्वाची विजेती ठरली होती. तसेच तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे.
तर आशिष कुलकर्णी हा एक उत्तम गायक आणि गीतकार आहे. २००८ मध्ये, त्याने झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये भाग घेतला होता. २०१५ मध्ये त्याने मित्रांसोबत ‘रॅगलॉजिक’ हा संगीत बँड तयार केला. ‘हार्ड रॉक कॅफे’, ‘हाय स्पिरिट्स’, ‘ब्लूफ्रॉग’ यांसारख्या अनेक लोकप्रिय म्युझिक बँडबरोबर त्याने काम केलं आहे. २०२० मध्ये, आशिष “इंडियन आयडॉलच्या १२ व्या पर्वातही सहभागी झाला होता.