भारत देश विविध संस्कृतींनी नटलेला आहे. येथे अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत, ज्या पाहण्यासाठी व्यक्ती परदेशातूनही येतात. ऐतिहासिक विविध वास्तुंपैकी एक प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहलला भेट द्यावी असं प्रत्येकाला वाटतं. मुघल सम्राट शाहजहाँ यांनी त्यांच्या पत्नी मुमताज़ यांच्या आठवणीत याची उभारणी केली होती. व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे अनेक व्यक्ती प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहलला भेट देत आहेत. अशात मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री स्वानंदी टिकेकरनेही नुकतीच ताजमहलला भेट दिली आहे.
ताजमहलला भेट दिल्यावर तिने या वास्तुचे काही सुंदर फोटो आणि एक पोस्ट तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. स्वानंदीने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ती ताजमहल जवळ उभी आहे, तसेच तिच्या आजूबाजूला अनेक पर्यटकांची गर्दी दिसत आहे. स्वानंदीने येथील अनुभव पोस्टमध्ये सांगितला आहे. यात तिने लिहिलं, “ताज कॅमेऱ्यात कैद करावा अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. कारण कॅमेऱ्याच्या तुलनेत माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं आणि मनात जे कोरलं ते फार महत्त्वाचं होतं.”
“येथील प्रत्येक दृष्य मी माझ्या डोळ्यांत आणि मनात साठवत होते. फिरून झाल्यावर आम्ही जेव्हा येथून बाहेर पडत होतो, तेव्हा मी प्रत्येक सेकंदाला मागे वळून पाहत होते. मला माझ्या डोळ्यांना ताजमहल प्रत्येक कोपऱ्यातून आणि प्रत्येक बाजूने मनात साठवायचा होता. एक माणूस म्हणून मी हे दृष्य कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा प्रयत्न केवळ अपयशी ठरला आहे”, असं स्वानंदी टिकेकरने तिच्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
स्वानंदी टिकेकरला विविध ठिकाणी भेट देण्याची आणि नवीन गोष्टींची माहिती मिळवण्याची फार आवड आहे. ती कायम भ्रमंती करत असते. काही दिवसांपूर्वीच ती आसामला गेली होती. येथील सुंदर ठिकाणांचे आणि मजा मस्तीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
स्वानंदीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने सहज सुंदर अभिनयाने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे. स्वानंदी बालपणापासून मनोरंजन विश्वात काम करत आहे. २००२ मधील ‘आभाळमाया’ ही तिची पहिलीच मालिका होती. यामध्ये तिने बालकलाकार म्हणून वर्षा हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये आलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये ती मिनलच्या भूमिकेत झळकली. तिची ही मालिका तुफान गाजली. मैत्रीवर आधारित या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं.