मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने एक स्वतंत्र्य स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिची कोणतीही मालिका असो, त्याला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना दिसतात. तेजश्री आता मालिकेसह सिनेसृष्टीतही अधिक सक्रिय झाली आहे. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या चित्रपटात तेजश्री विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या तिच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच दुसऱ्या बाजूला ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. पण अशातच तेजश्रीने मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
सूत्रानुसार, तेजश्री प्रधानने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काही दिवसांनी मुक्ताच्या भूमिकेत एक वेगळा चेहरा पाहायला मिळणार आहे. मराठीसह हिंदी मालिकाविश्वात झळकलेली अभिनेत्री मुक्ताच्या भूमिकेत झळकणार आहे. पण, तेजश्रीने मालिकाचा सोडण्याचा निर्णय का घेतला? हे अद्याप समोर आलेलं नाही.
हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-९ सदस्यांमध्ये कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? जाणून घ्या संपत्ती
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळे घेणार आहे. ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत झळकणार आहे. माहितीनुसार, स्वरदा लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
स्वरदा ठिगळेबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यानंतर ती हिंदी मालिकेत झळकली. तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तिने ‘प्यार के पापड’ या मालिकेतही काम केलं. या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिकेत झळकली. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. गेल्या वर्षी स्वरदा लग्नबंधनात अडकली.
हेही वाचा – Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
दरम्यान, तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ती मराठीसह हिंदीतही काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘दर्मियान’ नावाच्या चित्रपटाची स्क्रिनिंग झाली. मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तेजश्रीचा हा चित्रपट दाखवण्यात आला होता. तसंच २०२४मध्ये तेजश्री प्रधान बऱ्याच मराठी चित्रपटात पाहायला मिळाली.