अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी मालिकाविश्वातील तेजश्री आघाडीची अभिनेत्री आहे. तिची कोणतीही भूमिका असो ती चांगलीच गाजते. ‘होणार सून मी ह्या घरची’मधली जान्हवी असो, ‘अग्गंबाई सासूबाई’मधली शुभ्रा असो किंवा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता, तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळेच तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून तेजश्री सध्या नवनवीन नाटकांचा आस्वाद घेत आहे. तसंच ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. नुकतंच तिने एका अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं? नेमकं ती काय म्हणाली? जाणून घ्या…
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वी ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक पाहिलं होतं. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. त्यानंतर नुकताच तेजश्रीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती नाटकासह नाटकातल्या कलाकारांचं भरभरून कौतुक करताना दिसत आहे.
तेजश्री म्हणाली, “हाय, आज मी विलेपार्लेमध्ये इतकं सुंदर नाटक बघितलंय. प्रशांत दादा, सुनील इनामदार, हृषिकेश, अनघा यांनी इतकी सुरेख काम केलीयेत आणि फार मजा आली. विशेष कौतुक आहे अद्वैत दादरकरचं. त्याला प्रेक्षकांची भावना आणि त्यांची नस, नस कळते. नाटकाला कलाकारांनी खूप सुंदर न्याय दिला आहे. विलेपार्लेमध्ये या नाटकाला इतका सुरेख प्रतिसाद होता, प्रयोग बघायला खूप मज्जा आली. तीन तास आनंद.”
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानने प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. प्राजक्ता माळीचे गुरु श्री श्री रविशंकर आहेत, जे आता सर्वश्रुत आहे. याच श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात तेजश्री सध्या वास्तव्यास आहे. याच आश्रमातील तिने बरेच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे. स्वरदाने मराठीसह हिंदी मालिकेत काम केलं आहे. ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली आहे.