मराठी मालिकाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत; ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर निर्माण केलं आहे. यामधील एक म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्रीची कोणतीही मालिका, चित्रपट असो प्रेक्षक त्यावर भरभरून प्रेम करतात. त्यामुळे तिच्या मालिका नेहमी लोकप्रिय ठरतात. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकांनंतर तेजश्रीनं काही काळासाठी ब्रेक घेतला. तब्बल दोन वर्षानंतर तिनं ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं होतं. पण, काही दिवसांपूर्वी तेजश्रीची मालिकेतून एक्झिट झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये तेजश्री प्रधानची जागा स्वरदा ठिगळेने घेतली आहे. तेजश्रीच्या या निर्णयावर अजूनही प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. पण, या लोकप्रिय अभिनेत्रीची तुम्हाला हळवी जागा माहितीये का?

नुकतीच तेजश्री प्रधानने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने प्रेम, नातं, घटस्फोट, सोशल मीडिया याविषयी परखड मतं मांडली. यादरम्यान तिला विचारलं की, तुझ्यातला हळवेपणा तुला जपून ठेवावासा वाटतो का? आणि तो कसा जपतेस? यावर तेजश्री प्रधान म्हणाली, “आपण स्वतःबद्दल अधिक जाणीव न ठेवलेली बरी असते. मग ते आज ट्रोलिंग असू दे, तुझं यश असू दे किंवा जे काही असू दे, त्याच्याबद्दल आपण फार जाणीव स्वतःला करून दिली नाही ना ते फार छान असतं. म्हणजे मी नेहमी ही गोष्ट सांगते, माझ्या घरी अवॉर्ड्स ठेवलेल्या ठिकाणी एक जागा रिकामी आहे. ज्यावर लाइट आहे.”

“जेव्हा मला एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा मला आनंद होतो. त्यानंतर मी घरी जाते आणि मग मला ती रिकामी जागा दिसते. ती म्हणते, अभी बाकी है. कितीही मोठा अवॉर्ड घेऊन गेले, तो अवॉर्ड घेताना कितीही आनंद झाला असला, तरीही ती जागा तशीच ठेवते. ती जागा माझी हळवी बाजू आहे. ती नेहमी सांगते, अजून बाकी आहे. देव करो आणि कधीतरी मला आयुष्यात ऑस्कर मिळो. त्या जागी मला ऑस्कर ठेवायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही अर्धवट राहता किंवा आपल्यात काही बाकी आहे असं वाटतं ना, तेव्हा तुम्ही ध्येयाने झोपता आणि उठता. परिपूर्णता सुधारू शकत नाही. त्यामुळे मी परिपूर्ण आहे, असं म्हणत नाही,” असं तेजश्री प्रधानने सांगितलं.

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ती मालिकांबरोबर चित्रपटही करते. गेल्यावर्षी ती बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. सध्या तिच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तेजश्री सुबोध भावेबरोबर झळकली आहे. अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress tejashri pradhan says may i get an oscar sometime in my life pps