अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिची कोणतीही भूमिका असो, त्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. अलीकडेच तिचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपट प्रदर्शित झाला; ज्याला अजूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. तसंच तिने काही दिवसांपूर्वी लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ला रामराम केला. मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक मालिका सोडण्यामागचं कारण तेजश्रीने अद्याप स्पष्ट केलं नाही. पण, यामुळे तेजश्री खूप चर्चेत आली. आतापर्यंत तेजश्रीने बऱ्याच चित्रपटात आणि मालिकेत काम केलं आहे. यामधील एका भूमिकेमध्ये तेजश्रीला पुन्हा जगायचं असल्याचं, तिने सांगितलं.
नुकतीच तेजश्री प्रधानने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने प्रेम, नातं, घटस्फोट, सोशल मीडिया याविषयी परखड मतं मांडली. यादरम्यान, तेजश्रीला विचारलं की, तुला कुठल्या भूमिकेत पुन्हा एकदा जगायला आवडेल? यावर तेजश्रीने काय उत्तर दिलं? जाणून घ्या…
तेजश्री प्रधान म्हणाली, “‘असेही एकदा व्हावे’ नावाचा मी चित्रपट केला होता. या चित्रपटात मी आणि उमेश कामत होतो. त्या चित्रपटात मी आरजेची भूमिका केली होती आणि तेव्हा मला असं वाटलं होतं, आपण छान करतोय. पण, त्याच्यानंतरचं नाटक म्हणा, व्हॉइस मॉड्युलेशन म्हणा, आवाज वापराची पद्धत म्हणा हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतंय, आताची मी माइकशी चांगला संवाद साधू शकेन; त्या चित्रपटातल्या मीपेक्षा. त्यामुळे मला असं वाटतं राहणार आहे. अजून बरेच चित्रपट आहेत, ज्यातील भूमिकेबद्दल आपल्याला बरंच माहीत नसतं. पण, हे माहीत नसणंदेखील कधीकधी भूमिकेच्याबाबतीत चांगलं ठरतं. फार कळाल्या लागल्यानंतरही गोंधळ होऊ शकतो. परंतु, काहीवेळेला माहीत नसणं, हे कॅमेरात फार सुंदर आणि भाबडं दिसतं. ती निरागसता टिकून राहते.”
दरम्यान, सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या ऐवजी स्वरदा ठिगळे पाहायला मिळते. मालिकेतील ही नवी मुक्ता काहींच्या पसंतीस पडली आहे. पण, अजूनही काही जण तेजश्रीची सातत्याने आठवण काढताना दिसत आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानने प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवलं. प्राजक्ता माळीचे गुरु श्री श्री रविशंकर आहेत, जे आता सर्वश्रुत आहे. याच श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात तेजश्री काही दिवस वास्तव्यास होती. याच आश्रमातील तिने बरेच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते.