Marathi Actress Tejaswini Lonari New Production House : मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत नवीन व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळालं. अक्षया देवधर, श्रेया बुगडे, मृणाल दुसानिस, प्राजक्ता माळी, रेश्मा शिंदे या अभिनेत्रींपाठोपाठ आता आणखी एका लोकप्रिय नायिकेने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस २’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. मालिकाविश्व गाजवल्यावर आता तेजस्विनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

तेजस्विनीने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचं नाव ‘तेजक्राफ्ट प्रोडक्शन’ असं ठेवलं आहे. तिने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचा लोगो देखील खूपच सुंदर बनवला आहे. अभिनेत्रीने या लोगोची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तसेच पोस्ट लिहित तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तेजस्विनी लोणारीने सुरू केलं प्रोडक्शन हाऊस

तेजस्विनी लोणारी पोस्ट शेअर करत लिहिते, “आज एक खास दिवस, एक खास क्षण आणि माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण… मी माझ्या TejKraft Production चा लोगो लॉन्च करत आहे! हा एक मोठा टप्पा आहे, एक स्वप्न साकार होत आहे, आणि यामागे खूप मेहनत, जिद्द आणि समर्पण आहे. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं! आशा आहे की तुम्ही सगळे माझ्या या प्रवासात माझ्यासोबत असाल, साथ द्याल आणि हा सुंदर क्षण माझ्याबरोबर साजरा कराल. धन्यवाद आणि चला, हा प्रवास एकत्र एन्जॉय करूया!”

अमित भानुशाली, मानसी नाईक, अभिषेक रहाळकर, आशिष पाटील, अभिजीत खांडकेकर, अवनी, गिरीजा प्रभू या कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, तेजस्विनीने मालिकांसह ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘गुलदस्ता’, ‘अफलातून’ अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात देखील ती सहभागी झाली होती.