अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या तिच्या ‘येक नंबर’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. १० ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ चित्रपटात तेजस्विनीने दोन भूमिका वटवल्या आहेत. एक निर्माती आणि दुसरी अभिनेत्री म्हणून तिने या चित्रपटासाठी काम केलं आहे. तिच्या ‘येक नंबर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार मंडळींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस्विनी पंडितने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनी मावशी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची बहिणी पूर्णिमा पुलन आई झाली आहे. पूर्णिमाने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. या चिमुकलीबरोबरचे खेळतानाचे फोटो शेअर करून तेजस्विनीने मावशी झाल्याचं जाहीर केलं आहे. तेजस्विनीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: चौथ्या आठवड्यात ‘हा’ सदस्य झाला एलिमिनेट, घराबाहेर जाण्यापासून शिल्पा शिरोडकरसह सुरक्षित झाले ‘हे’ सहा सदस्य

तेजस्विनी पंडितने फोटो शेअर करत लिहिलं आहे, “माझ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींने मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली! अनेक वर्ष या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला १४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला.”

पुढे तेजस्विनीने लिहिलं की, त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं. पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षणचं नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकलं. आमच्या कुटुंबाची ‘कथा’ सुफळ संपूर्ण म्हणुया? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय. होऊ दे खर्च…तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…शुभ दीपावली…शुभं भवतु.

हेही वाचा – Bigg Boss 18: दिवाळीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस’च्या घरात होणार मोठा धमाका! दोन दमदार वाइल्ड कार्डची होणार एन्ट्री

हेही वाचा – Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचा दिवाळीचा पहिला दिवस ‘असा’ केला साजरा, पाहा व्हिडीओ

दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या या पोस्टवर चाहत्यांसह इतर कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे, मृणाल दुसानिस, आनंदी जोशी, सावनी रविंद्र, मयुरी देशमुख, स्वप्नील जोशी, नम्रता संभेराव, धैर्य घोलप, सायली पाटील, नागेश भोसले अशा अनेक कलाकारांनी तेजस्विनी आणि तिच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress tejaswini pandit sister poornima pullan gave birth to a baby girl pps