केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. सध्या सर्वत्र ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे कौतुक पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नुकतंच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल खुलासा केला.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी शशी हे पात्र साकारलं आहे. त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. वंदना गुप्तेंना ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात नवऱ्याने कसं प्रपोज केलं? त्यानंतर सासूला भेटायला गेल्यावर काय घडलं? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला.
आणखी वाचा : “माझा प्रयोग होता अन्…” वंदना गुप्तेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या ताफ्यात घुसवलेली गाडी; म्हणाल्या “त्यांचे सुरक्षारक्षक…”
“मला शिरीषने प्रपोज केला होता. त्यानंतर मी माझ्या सासू सासऱ्यांना पहिल्यांदा भेटायला गेले होते. त्यावेळी मला माझ्या आईने असं वागं, वाकून नमस्कार कर, जोरजोरात हसू नको, बोलू नको, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. माझे सासू सासरे आईच्या गाण्याचे भक्त होते. त्यांचं घर आईचं गाणं लागल्याशिवाय सुरुच व्हायचं नाही. माणिक बाईंची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येणार, असं आपला मुलगा म्हणतो. खरंच ती येतेय का बघूया, यासाठी त्यांनी मला भेटायला बोलवलं.
आईच्या गाण्याचे ते दोघेही भक्त होते. त्यांनी मला गातेस का, असा प्रश्न विचारला होता. मी हो म्हटलं. त्यावर त्यांनी मला जरा गाणं म्हणून दाखवं, असे सांगितले. मी त्यावेळी ‘पाडाला पिकला आंबा’ हे गाणं त्यांच्यासमोर गायले. त्यात ‘नीट बघा’ हे बोलताना मी सासऱ्यांकडे हात दाखवला. या प्रसंगावेळी माझा नवरा बाजूला बसला होता. ते ऐकल्यानंतर माझ्या नवऱ्याने मान खाली घातली, ती लग्नाला ५० वर्ष झाल्यानंतर अजून वर काढलेली नाही”, असे वंदना गुप्ते यांनी सांगितले.
आणखी वाचा : “मंगळागौर म्हणजे काय?” वंदना गुप्ते म्हणाल्या, “लग्न आणि हनिमूननंतर…”
दरम्यान वंदना गुप्ते यांनी नुकतंच लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी त्यांनी पती शिरीष गुप्ते यांच्याशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. कुटुंबियांच्या उपस्थिती आणि घरगुती पद्धतीने त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला.