Vishakha Subhedar New Car : मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखलं जातं. गेली कित्येक वर्ष तिने विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विशाखा सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते. विविध सामाजिक गोष्टींवर ती आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाष्य करते. मात्र, सध्या विशाखाने शेअर केलेली एक खास पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

विशाखा सुभेदारच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालेलं आहे. अभिनेत्रीने आपल्या पतीसह नवीन गाडी खरेदी केली आहे. विशाखाने गाडी घेतल्यावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने सर्वात आधी नॅनो गाडी घेतली होती. यानंतर गाडीबरोबर वैयक्तिक आयुष्यात प्रगती झाली आणि यापुढेही अशीच प्रगती होत राहो असं विशाखाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नवीन गाडी खरेदी करताना विशाखा सुभेदारचे पती सुद्धा उपस्थित होते. या जोडप्याने कारची पूजा करून आपल्या घरच्या या नव्या सदस्याचं आनंदाने स्वागत केलं.

विशाखा पोस्ट शेअर करत लिहिते, “आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य. अगदी Nexon पाहावी अशी… नवी गाडी घेतल्याचा आनंद तर आहेच. विशेष म्हणजे यंदाही ‘टाटा’ची गाडी घेतली. सगळ्यात पहिल्यांदा नॅनो मग, पुन्हा एक नॅनो आणि आता ही दुसरी Nexon. माझ्या आधीच्या Nexon गाडीला जुळी बहीण आली. माझं ‘टाटा’चं वेडच म्हणा, पण येणाऱ्या प्रत्येक गाडीबरोबर प्रगती झाली. ती अशीच होत राहो.. माझी आधीची गाडी, माझी सखी, मी तुला खूप मिस करेन असं मी म्हणणारच नाही. कारण, तू तर माझ्यापाशी आहेसच. अंबरनाथ घरी.”

विशाखाने नवीन गाडी खरेदी केल्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ही अभिनेत्री गेली काही वर्षे ‘स्टार प्रवाह’च्या ‘शुभविवाह’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. याशिवाय ती रंगभूमीवर सुद्धा विविधांगी भूमिका साकारताना दिसते.