अभिनेत्री विशाखा सुभेदारला कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. त्यांना विनोदी भूमिकांसाठी खास ओळखले जाते. सध्या विशाखा सुभेदार या ‘कुर्रर्रर्र’ नाटकात व्यस्त आहे. त्याबरोबरच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत आहे. नुकतंच विशाखा सुभेदारला एका शिक्षक चाहत्याने पत्र लिहिले आहे. त्यांनी त्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
विशाखा सुभेदारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने एका चाहत्याचे पत्र शेअर केले आहे. राजेंद्र माणगावकर असे या चाहत्याचे नाव असून ते सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी या पत्राद्वारे विशाखा सुभेदार यांचे कौतुक केले आहे. तसेच हास्यजत्रामध्ये परतण्याची विनंतीही केली आहे.
विशाखा सुभेदारला चाहत्याने पाठवलेलं पत्र
“विशाखा ताई तुमचे जगात लाखो चाहते आहेत. त्यातीलच मी एक आहे. परंतु फरक इतकाच की मी तुमचा भक्त आहे. देव तर कुणीच पाहिला नाही. परंतु तुमच्या रुपात मी तुम्हास देव मानतो. यात खरंच अजिबात अतिशयोक्ती नाही. मला १५ वर्षांपूर्वी हृदयाचा आजार झाला होता. मी खूप घाबरलो होतो. कारण घरातील जबाबदाऱ्या खूपच होत्या. औषधे चालूच होती आणि त्याचवेळी फू बाई फू मधील भाग पाहिला. वैभव मांगले व तुम्ही, तो भाग माझ्या मनाला इतका भावला की तुमचा प्रत्येक भाग तहान भूक विसरुन मी पाहू लागलो आणि पुढील काही महिन्यातच मी पूर्ण बरा झालो. ही तुमचीच कृपा नाही तर काय. त्यानंतर हास्यजत्राचे सर्व भाग नियमित पाहू लागलो. हास्यजत्रेतील सर्वच कलाकार अगदी उत्कृष्ट काम करतात. परंतु सतत तुमची उणीव जाणवते. पण मी मात्र आजही मागील भागांची वाट पाहत असतो,
दोन वर्षांपूर्वी मी, माझी बायको आणि मुलगा मंदार कालिदासमध्ये शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक पाहण्यास गेलो होतो. तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा मोह झाला. मनात भीती असतानाही मी आणि मंदार मध्यंतरात तुम्हाला भेटलो. त्यावेळी माझी आणि मंदारची आपुलकीने चौकशी केली. त्यानंतर दोन चार वेळा तुमच्या घरी आलो पण तुम्ही बाहेरगावी गेला होता. आता तर तुम्ही हास्यजत्रेतून बाहेर गेलात, याचे मला अतिशय दु:ख झाले. सध्या तुम्ही निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. यातही तुम्हाला घवघवीत यश प्राप्त होणार, याची मला खात्री आहे. पण मन मानायला तयार नाही आणि कधी तरी एकदा मला तुमची भेट घ्यायची आहे, हे विसरु नका. तुम्हाला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा”, असे राजेंद्र यांनी पत्रात लिहिले आहे.
विशाखा सुभेदार यांनी या पत्राचा फोटो शेअर केला आहे. “हे फार कमाल फीलिंग आहे… जेव्हा एखादा चाहता आपल्याला भेटायला आपलं घर गाठतो.. आणि भेटच होतं नाही.. आणि मग एक चिठठी ठेवून जातो.. कलाकार म्हणून जन्माला आले त्या करिता देवाचे आभार.. आणि कलाकारांनवर प्रेम करणाऱ्या रसिकांचे आभार”, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.