Marathi Actress Yogita Chavan Wedding Dance : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांचे सूर हे मालिकेचे सेटवर जुळले आहेत. एकाच मालिकेत काम केलेले अनेक कलाकार आता साता जन्माचे सोबती झाले आहेत. तितीक्षा-सिद्धार्थ, शिवानी-अजिंक्य, हार्दिक-अक्षया यांच्यासह प्रेक्षकांमध्ये आणखी जोडी लोकप्रिय आहे ती म्हणजे योगिता चव्हाण व सौरभ चौघुले. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे ही जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिताने ‘अंतरा’, तर सौरभ चौघुलेने ‘मल्हार’ हे पात्र साकारलं होतं. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली आणि या दोघांनी ३ मार्च २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.
गेल्या महिन्यात योगिता-सौरभच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. आता लग्नाला जवळपास वर्ष झाल्यावर योगिताने स्वत:च्या लग्नातील एक खास व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री विविध बॉलीवूड गाण्यांवर जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
योगिता चव्हाणला डान्सची प्रचंड आवड आहे. त्यामुळे स्वत:च्या लग्नात सुद्धा अभिनेत्री बेभान होऊन मनसोक्त डान्स करताना दिसली. सर्वात आधी सलमान खान आणि भाग्यश्रीच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील “दिल दीवाना…” गाण्यावर योगिताने ठेका धरला होता. यानंतर अभिनेत्री रेखाच्या “परदेसिया…” गाण्यावर थिरकली.
यानंतर, योगिताने “मेरा पिया घर आया ओ राम जी”, “साजन जी घर आए” या गाण्यांवर देखील डान्स केल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री डान्स करताना तिचा पती सौरभ मोठ्या उत्साहात तिला प्रोत्साहन देताना दिसला. उपस्थितांनी टाळ्या अन् शिट्ट्या वाजवून योगिताच्या परफॉर्मन्सला दाद दिल्याचं पाहायला मिळालं. डान्स करताना अभिनेत्रीची कमाल एनर्जी लक्षवेधी ठरली होती.
अभिनेत्री हा खास व्हिडीओ शेअर करत लिहिते, “हा लग्नातला खास व्हिडीओ मी जरा उशिराच शेअर करतेय… कारण, मी हा प्रत्येक क्षण जगले आहे आणि हा डान्स करतानाच्या आठवणी माझ्या मनात कायम साठून राहतील. माझा संगीत सेरेमनीमधला डान्स… हा फक्त परफॉर्मन्स नव्हता, ते आमच्या प्रेमाचं सेलिब्रेशन होतं. आमच्या प्रेमाची एक नवीन सुरुवात होती… आजही हा व्हिडीओ पाहिल्यावर मनात काहीतरी वेगळंच फिलिंग येतं…तो एक जादुई क्षण होता.”
दरम्यान, योगिता चव्हाणच्या व्हिडीओवर तिचा पती अभिनेता सौरभ चौघुले, अक्षया नाईक यांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. याशिवाय चाहत्यांनी सुद्धा अभिनेत्रीच्या जबरदस्त डान्सचं कौतुक केलं आहे.