आलिया-रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील गाण्यांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. ‘तुम क्या मिले…’ या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता सोशल मीडियावर ‘व्हॉट झुमका’गाण्याचा ट्रेंड सुरु आहे. या गाण्यावर थिरकण्याचा मोह दोन मराठी अभिनेत्रींनाही आवरता आलेला नाही. नुकताच या अभिनेत्रींनी ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर साड्या नेसून भन्नाट डान्स केला आहे.
हेही वाचा : Video : “दीपिकाची कॉपी, ढासळलेला आत्मविश्वास…”, आलिया भट्टचा ‘तो’ रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांनी आलिया-रणवीरच्या ‘व्हॉट झुमका’गाण्यावर सध्याचा ट्रेंड फॉलो करत डान्स केला आहे. या दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेत परस्परविरोधी असलेल्या सासू-सुनेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ऑफस्क्रीन दोघींना एकत्र डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने म्हटले आहे, “मालिकेत विरोधात असणाऱ्या दोन बायका एकत्र डान्स करत आहेत?? बाबो…मग काय मालिकाच संपली की राव…” तसेच दुसऱ्या एका युजरने, “तुम्ही दोघी मालिकेत आणि ऑफस्क्रीन दोन्हीकडे छान दिसता.” अशी कमेंट केली आहे. तर, आणखी काही युजर्सनी “मालिकेतील सासू-सुनेचा सुंदर व्हिडीओ…” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांच्यासह अजिंक्य ननावरे, मुग्धा गोडबोले, अजिंक्य जोशी, अमृता रावराणे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.