‘पुष्पा २’ चित्रपटातील “अंगारो सा…” हे गाणं सध्या सर्वत्र ट्रेंड करत आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाची गाणी सुद्धा सर्वत्र व्हायरल झाली होती. ‘पुष्पा – द राइज’ हा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने प्रमुख भूमिका साकारली होती. आता येत्या ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पुष्पा आणि श्रीवल्लीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पुष्पा २’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र ‘पुष्पा’ फिव्हर चढला आहे. सामान्य माणसांपासून मोठमोठे सेलिब्रिटी सध्या या ‘पुष्पा २’ चित्रपटामधील “अंगारो सा…” गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर, स्पृहा जोशी, क्षितीश दाते, शरयू सोनावणे अशा बऱ्याच कलाकारांनी ‘पुष्पा २’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. आता नुकतीच आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याला “अंगारो सा…” गाण्याची भुरळ पडली आहे. परंतु, या दोघांनी नेहमीपेक्षा काहीसा हटके डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘सुख कळले’ फेम अभिनेत्री स्वाती देवल आणि संगीत दिग्दर्शक तुषार देवल ‘पुष्पा २’च्या गाण्यावर हटके अंदाजात थिरकले आहेत. अभिनेत्रीने या व्हिडीओला “लग्नानंतरचे घरगुती पुष्पा आणि वल्ली” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये स्वाती आणि तुषार घरच्या कपड्यांवर डान्स करत हातात लादी पुसायचा कपडा, झाडू, बादली घेऊन घरकाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
देवल जोडप्याने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. लग्नानंतर कशाप्रकारे घरातली सगळी कामं करून आपलं करिअर सांभाळावं लागतं हे या जोडप्याला या व्हिडीओद्वारे सूचित करायचं आहे.
स्वाती आणि तुषार देवल यांनी शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “तुम्ही दोघं पूर्ण वेडे आहात, कसं सुचतं हे?”, “घर घर की कहाणी”, “तुम्ही कमाल आहात”, “भारीच”, “जबरदस्त” अशा कमेंट्स या जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, स्वाती देवल सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुख कळले’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिका साकारत आहे.