आई कुठे काय करते ही टेलिव्हिजवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष ही पात्रे घराघरांत पोहोचली आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानी असते. मात्र, काही दिवसांपासून मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. मात्र, हे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडेनासे झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमधून ही मालिका बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो बघून प्रेक्षक खूपच भडकल्याचे दिसून येत आहे.
स्टार मराठी सिरिअल ऑफिशिअल या इन्स्टाग्राम पेजवर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आता आशुतोषचे निधन झाल्याचे दाखविण्यात आले आहे. आशुतोषच्या निधनाने अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे. या सगळ्याला आशुतोषची आई अरुंधतीला जबाबदार धरते. तेवढ्यात अरुंधतीची आधीची सासू कांचन तिथे येते आणि ती अरुंधतीच्या बाजूने ठामपणे उभी राहते. त्यावर आशुतोषची आई कांचनला “तुमच्या सुनेला (अरुंधतीला) तुमच्याकडेच घेऊन जा”, असे म्हणते. त्यावर कांचन म्हणते “मी घेऊन जाण्यासाठीच आली आहे; पण सुनेला नाही, तर माझ्या मुलीला”. सोशल मीडियावर हा प्रोमो मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.
मात्र, हा प्रोमो बघून प्रेक्षक खूपच भडकले आहेत. अनेकांनी या प्रोमोच्या व्हिडीओवर कमेंट करीत संताप व्यक्त केला आहे. एकाने लिहिले, “कृपया ही मालिका बंद करा. खूप अति होतंय आता”. तर दुसऱ्याने, “काय फालतूगिरी आहे. लोक बघतात म्हणून काहीही दाखवता का? थोडं इंटरेस्टिंग दाखवत आहेत म्हणून बघायला सुरुवात केली, तर आता पुन्हा असलं दाखवतायत,” अशी कमेंट केली आहे.तिसऱ्याने, “मी आता ही मालिकाच बघणं बंद करणार आहे,” अशी कमेंट करीत संताप व्यक्त केला आहे. तर आणखी एकाने खूप बोरिंग मालिका आहे ही, आता या मालिकेचे नाव ऐकण्याचीही इच्छा होत नाही” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी “आता कांचन अरुंधतीचं लग्न अनिरुध्दबरोबर लावून देणार” असे म्हणत ट्रोल केले आहे.
काही दिवसांपासून आई कुठे काय करते मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. “मालिकेचं कथानक अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत कथा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही मालिका बंद होणार नाही,” असे ते म्हणाले होते.