मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण यामुळे जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. लवकरच झी मराठीवर लोकप्रिय मालिका ‘नवा गडी नवं राज्य’ ऑफ एअर होणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग काही दिवसांपूर्वीचं झालं असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ऑगस्ट २०२२मध्ये सुरू झाली होती. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. आनंदी, रमा, राघव, सुलक्षणा, वर्षा, रेवा अशी मालिकेतील अनेक पात्र घराघरात पोहोचली. नवनवीन ट्विस्टमुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. पण मध्यंतरी मालिकेच्या वेळा सतत बदलण्यात आल्या. सध्या मालिका दुपारी २ वाजता प्रसारित होत आहे. मात्र आता लवकरच ‘नवा गडी नवं राज्य’ बंद होणार आहे.

हेही वाचा – श्रेयस तळपदेच्या पत्नीने पोस्ट करून अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाली…

१० डिसेंबरला मालिकेचं शेवटचं शूटिंग झालं असून २३ डिसेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. यासंदर्भातील पोस्ट ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी शेअर केली आहे. त्यांनी ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील कलाकार मंडळींबरोबरचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “अखेर आम्ही आता २३ डिसेंबरपर्यंत तुमच्या प्रेमाचे साक्षीदार राहणार आहोत. खूप प्रेम दिलंत मित्र-मैत्रिणींनो…आभार नाही मानणार कारण आपलं हक्काचं…जिव्हाळ्याचं नातं आहे.”

वर्षा दांदळे यांच्या पोस्टवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकरीनं लिहिलं आहे, “झी मराठीने खूप चुकीचा निर्णय घेतला आहे.” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “किती छान मालिका आहे. कशाला बंद करतात? ज्या नको त्या बंद कराना.” तर तिसऱ्या नेटकरीनं लिहिलं आहे, “‘नवा गडी नवं राज्य’ ही माझी सध्याची सर्वात आवडती मालिका होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही असं जाणवलं नाही की ही मालिका कुठेतरी मरगळली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप छान टीआरपी या मालिकेने झी मराठीला मिळवून दिला. तुमच्या सर्वांची खूप आठवण येणार आहे. तुम्हा सर्वांना नवीन प्रोजेक्टसाठी आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. परत एकदा सर्वांनी या…”

हेही वाचा – तेजश्री प्रधान मालिकेच्या सेटवर राज हंचनाळेला सतत का ओरडत असते? जाणून घ्या…

दरम्यान, ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेबरोबर ‘३६ गुणी जोडी’ मालिका देखील प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. तसेच लवकरच ‘झी मराठी’वर नवीन रिअ‍ॅलिटी शो भेटीस येणार आहे. ‘ड्रामा Juniors’ असं नव्या रिअ‍ॅलिटी शोचं नाव आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi serial nava gadi nava rajya last episode will air on december 23 pps