‘स्टार प्रवाह’वरील सर्वच मालिका या कायमच चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकारही प्रसिद्धीझोतात आल्याचे पाहायला मिळते. याच वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत युवराजची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकरने गुडन्यूज दिली आहे. अभिनेता विजय आंदळकर लवकरच बाबा होणार आहे. त्याने सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.
विजय आंदळकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एका केकचा फोटो टाकला आहे. यातील एका बाजूला गुलाबी रंग आणि दुसऱ्या बाजूला हिरवा रंग पाहायला मिळत आहे. त्यावर बाळाचे छोटे शूजही दिसत आहे. यावर तो किंवा ती? लवकरच आपल्याला समजेल? असे त्यावर लिहिले आहे.
याला कॅप्शन देताना विजय आंदळकरने फक्त हॅप्पी असा हॅशटॅग दिला आहे. यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अभिजीत खांडकेकर याने अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने अभिनंदन भावा असे म्हटले आहे.
दरम्यान अभिनेता विजय आंदळकर हा पिंकीचा विजय असो या मालिकेत युवराज या भूमिकेत दिसून येत आहे. या मालिकेत विजयने साकारलेल्या युवराज या भूमिकेला विशेष पसंती मिळत आहे. त्याचा रावडीपणा आणि बिनधास्तपणा प्रेक्षकांना आवडत आहे. विजयच्या पत्नीचे नाव रुपाली झनकर असे आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी ते विवाहबंधनात अडकले होते.
आणखी वाचा : खासदारांना माज असतो म्हणणाऱ्याला डॉ. अमोल कोल्हेंनी दिलं भन्नाट उत्तर; म्हणाले, “तुमचं मत…”
झी मराठी वाहिनीवरील ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत एक काम करत असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या मालिकेत त्यांनी काजल आणि मदनची भूमिका साकारली होती. विजयने याआधी बऱ्याच मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ‘गोठ’ या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.