‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सातत्याने चर्चेत आहे. ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एक रिल लाईफ जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच त्या दोघांच्या मेहंदी सभारंभाचे फोटो समोर आले आहेत.
झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिका विशेष चर्चेत ठरली होती. ही मालिका अवघ्या १०० दिवसांची असली तरी त्या मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. या मालिकेतील प्रत्येक पात्र कायमच चर्चेत राहिले. या मालिकेत येणारी उत्कंठावर्धक वळण, गूढ रहस्य यामुळे तिला चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील बाबूराव, सायली, सतेज, रोहिणी, अभय, हणम्या या कलाकारांना चांगली प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील विक्रांत आणि रोहिणीच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या दोघांच्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत.
आणखी वाचा : “मी कुटुंबासाठी…” मानसी नाईकने सांगितले प्रदीप खरेराशी लग्न करण्यामागचं खरं कारण
अभिनेता नचिकेत देवस्थळी याने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मेहंदीच्या सभारंभाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती परत आलीय मालिकेतील काही कलाकारही पाहायला मिळत आहे. यावेळी त्याची होणारी पत्नी अभिनेत्री तन्वी कुलकर्णीच्या हातावर मेहंदी सजल्याचे पाहायला मिळत आहे. याचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत. त्यामुळे आता लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
अभिनेत्री तन्वी कुलकर्णी आणि नचिकेत देवस्थळी यांचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा पार पडला होता. तन्वीने ‘ती परत आलीये’या मालिकेत रोहिणीची भूमिका साकारली होती. तर नचिकेत देवस्थळी याने या मालिकेत विक्रांतची भूमिका साकारली होती.
आणखी वाचा : “फक्त ६ दिवस शिल्लक…” राणादा- पाठकबाईंच्या लग्नाची तारीख समोर
तन्वी कुलकर्णी हिने रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुरुषोत्तम करंडकसारख्या अनेक नाटकांच्या स्पर्धेत तिने काम केले आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत तन्वीने सगुणाबाईंची भूमिका साकारली होती. तर जुळता जुळता जुळतंय की, स्वराज्य जननी जिजामाता, ती परत आलीये यांसह इतर मालिकांमधून तन्वी ही प्रसिद्धीझोतात आली. अ ट्रायल बिफोर मॉन्सून या शॉर्टफिल्ममध्ये तन्वीने मोहन आगाशे यांच्यासोबत काम केले होते.
तर नचिकेत देवस्थळी हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. सुखन या लोकप्रिय कार्यक्रमाचा तो एक महत्वाचा भाग बनला आहे. नाटक कंपनीच्या सतीश आळेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘महानिर्वाण ‘ या नाटकातून नचिकेतने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ती परत आलीये ही नचिकेतची पहिलीच मालिका होती. यातही तो विक्रांतच्या महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाला.