सध्या मालिकेचा टीआरपी हा अत्यंत महत्त्वाचा भाग झाला आहे. एखाद्या मालिकेला टीआरपी चांगला असेल तर वाहिनी ती मालिका दीर्घकाळ सुरू ठेवते. पण एखाद्या मालिकेला टीआरपी कमी असेल तर मग अचानक मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनी घेते. त्यामुळे टीआरपी चांगला ठेवण्यासाठी निर्माते मालिकेत सातत्याने नवनवीन ट्विस्ट आणतात. नुकतीच मागील आठवड्याची टीआरपी यादी समोर आली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका अव्वल स्थानावर आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून जुई गडकरी व अमित भानुशाली यांची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ज्याप्रमाणे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते, त्याप्रमाणे टीआरपीच्या शर्यतीतही ‘ठरलं तर मग’चं अधिराज्य कायम आहे.
मागील आठवड्याच्या टीआरपी यादीत ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानावर असून ६.८ रेटिंग मिळाले आहे. त्यानंतर तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला ६.६ रेटिंग मिळाले आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ झाली आहे. या मालिकेला ६.३ रेटिंग मिळाले आहे. याशिवाय ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीआरपीत वाढ झाली आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांच्या टीआरपीमध्ये घसरण झाली आहे. पण या मालिका टॉप १० मध्ये कायम स्थान टिकवून आहेत. मागील आठवड्याच्या टीआरपीची यादी ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
मागील आठवड्याच्या टॉप १० मालिका
१) ठरलं तर मग
२) प्रेमाची गोष्ट
३) तुझेच मी गीत गात आहे
४) लक्ष्मीच्या पाऊलांनी
५) आई कुठे काय करते
६) सुख म्हणजे नक्की काय असतं
७) कुन्या राजाची गं तू राणी
८) आई कुठे काय करते – महाएपिसोड
९) मन धागा धागा जोडते नवा
१०) शुभविवाह