मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.अवधूत गुप्ते हा सध्या त्याच्या खुपते तिथे गुप्ते या नव्या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सध्या समोर आले आहेत. त्यातच आता अवधूत गुप्तेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे.
काही महिन्यांपूर्वी अवधूत गुप्तेने राजकारणात येण्याची मोठी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी कोणत्या पक्षात जाणार याबद्दल काहीही भाष्य केले नव्हते. मात्र आता त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीसह पक्षांसाठी गायलेल्या गाण्यांबद्दलही भाष्य केले आहे. नुकतंच अवधूत गुप्तने ‘महाराष्ट्र टाईम्स’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने राजकीय पक्षातील अनेक नेत्यांबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
“माझ्या कामाच्या निमित्तानं अनेक राजकीय पक्षांशी माझे संबंध आले. माझं ‘ऐका दाजिबा’ हे गाणं सुपरहिट झाल्यानंतर एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला भेटायला बोलावलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त करिष्मा होता. त्यांच्याकडे गेल्यावर हरखून जायला व्हायचं. त्यावेळी मी २२-२३ वर्षांचा होतो.
अनेकदा ते मला गप्पा मारायला बोलावायचे. आमच्यात तेव्हा ऋणानुबंध निर्माण झाले. शिवसेना पक्षासाठी मी अनेक गाणी केली. जवळपास दहा वर्षं मी शिवसेनेची कामं करत होतो. पण त्यानंतर मलाच काहीसं एकांगी वाटायला लागलं. याच्या पलीकडची बाजू काय असेल असा विचार माझ्या मनात डोकावू लागला”, असेही तो म्हणाला.
आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला
“या दरम्यान मी सुप्रिया सुळे यांच्या एका एनजीओसाठी काम केलं. ‘राष्ट्रवादी लई भारी’ असं गाणं त्यांना आवडलं. त्यांनी मला राष्ट्रवादीचं काम दिलं. पण जाहिरात क्षेत्रातील नैतिकतेनुसार तुम्ही एकाच वेळी प्रतिस्पर्ध्यांसाठी काम करू नये. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंना तसं कळवलं. त्यांनीही परवानगी दिली, असेही त्याने सांगितले.
त्यानंतर ‘मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी’ हे गाणं केलं आणि तेसुद्धा लोकप्रिय झालं. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्यासाठी एक गाणं गायलो आणि ते देखील लोकप्रिय झालं. आता मनसेसाठी केलेलं गाणंही लोकप्रिय ठरत आहे. मला असं वाटतं की ज्यात कुणीही ढवळाढवळ करत नाही, अशी गाणी सुपरहिट ठरतात”, असेही अवधूत गुप्तेने म्हटले.