किरण यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय. सध्या ते काही चित्रपटांचं शूटिंगही करत आहेत. किरण यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत राजकीय इनिंग सुरू केली. ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. चित्रपट, राजकीय घडामोडी तसेच समाजकारण, सोशल मीडियावरील ट्रेंड्स याबद्दल ते सोशल मीडियावर कायम व्यक्त होत असतात. यामुळे बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो.
नुकतंच किरण माने यांनी प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या नव्या व्हिडीओबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यनाई ध्रुवच्या धाडसी व्हिडीओचे प्रचंड कौतुक केले आहे. सोशल मीडियावर सध्या किरण मानेंची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. ध्रुव राठीने या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर आणि त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर टीका केली आहे.
आणखी वाचा : ‘कभी हां कभी ना’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानची भूमिका कुणी करावी? सूचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या, “हे पात्र…”
आपल्या या पोस्टमध्ये किरण माने लिहितात, “ध्रुव राठी! इस व्हिडीओने आग लगा दी भाई. संविधान आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने बघा. बघाच, पुन्हा पुन्हा बघा आणि शेअर करा.” अशी पोस्ट करत किरण माने यांनी ध्रुवच्या या लेटेस्ट व्हिडीओची लिंक कॉमेंट सेक्शनमध्ये दिली आहे. नेहमीप्रमाणेच किरण माने यांच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी कॉमेंट करत माने व ध्रुव राठी या दोघांचे कौतुक केले आहे तर काहींनी किरण माने यांना ट्रोल केलं आहे.
इतकंच नव्हे तर ध्रुव राठीचा हा व्हिडीओ साऱ्या जगात व्हायरल होत असून वेगवेगळ्या भाषांमध्ये तो भाषांतरित केला जात आहे, मराठीतदेखील कुणी तसं करणार आहे का? असंही किरण यांनी आणखी एक पोस्ट करत विचारलं आहे. पुढील पोस्टमध्ये माने लिहितात, “शंभर न्यूज चॅनल्स दोन वर्षं करू शकणार नाहीत इतका प्रभाव ध्रुव राठीच्या व्हिडीओने साधलाय. संपूर्ण जगभर व्हायरल होतोय, इतर भाषांमध्ये भाषांतरीत होतोय, मराठीत कुणी करतंय का?”
मोदी सरकारविरोधात भाष्य करणाऱ्या ध्रुव राठीचे असे बरेच व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्येही त्याने मोदी सरकार भारतात हुकुमशाही पद्धतीने राज्य करत असल्याचा दावा केला आहे. इतकंच नव्हे तर बऱ्याच गोष्टींचे पुरावे, लेख, व्हिडीओज सादर करून मोदी सरकार त्यांच्या सत्तेचा कसा गैरवापर करत आहे हे सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून मोदी सरकार हे साऱ्या देशात केवळ एकाच पक्षाचं वर्चस्व आणू पहात असल्याचंही ध्रुव या व्हिडीओमध्ये बोलला आहे. किरण माने यांच्याबरोबरच सामान्य लोक आणि इतर काही सेलिब्रिटीजनीसुद्धा ध्रुवच्या व्हिडीओचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.