‘मास्टरशेफ इंडिया’च्या सातव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला. या फिनालेमध्ये नयनज्योती सैकियाने बाजी मारली आणि विजेतेपद पटकावलं. तर, सुवर्णा बागुल आणि सांता सरमा या कुकिंग रिअॅलिटी शोच्या उपविजेत्या ठरल्या. यंदाचं पर्व सोशल मीडियावर चांगलंच गाजलं. ज्या स्पर्धकामुळे हे पर्व गाजलं ती होती अरुणा विजय. अरुणा फिनाले टास्कच्या एक दिवस आधी स्पर्धेतून एविक्ट झाली. पण ती शोमध्ये असताना तिच्यासाठी परीक्षक इतर स्पर्धकांशी भेदभाव करत असल्याचा आरोप झाला होता. याबद्दल तिने भाष्य केलंय.
नयनज्योती सैकिया ठरला ‘MasterChef India’चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाले २५ लाख, ट्रॉफी अन्…
अरुणा विजयला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशातच ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना अरुणाने आता तिचा मास्टरशेफचा प्रवास सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगितले आणि या शोमध्ये सहभागी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. अरुणा म्हणाली, “मला खात्री नव्हती की मी शोमध्ये इतके दिवस टिकू शकेन. अंतिम फेरीच्या अगदी आधी बाहेर पडल्याबद्दल मला खूप दुःख झाले आहे, परंतु शोमध्ये जे शिकायला मिळालं, त्याबद्दल खूप आनंद होतोय.”
“मला वाटतं अन्नाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. शोमधून बाहेर पडल्याबद्दल मला वाईट वाटतंय, परंतु कदाचित देवाच्या मनात माझ्यासाठी काहीतरी वेगळे असेल. ६५ भागांपैकी मी ६४ भागांमध्ये स्वयंपाक केला आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे,” असं अरुणा म्हणाली.
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल अरुणा म्हणाली, “शोच्या सर्व ग्लॅमरच्या मागे मी एक सामान्य व्यक्ती आहे जिला या सगळ्याची सवय नाही. ट्रोलिंगने माझ्यावर खूप वाईट परिणाम झाला.मी माझ्या पतीला अनेक वेळा फोन करून सांगितले की मला घरी परत यायचं आहे. मी रडून रडून झोपी जात असे, या संपूर्ण गोष्टीचा माझ्या शोमधील कामगिरीवरही परिणाम झाला. माझे मन या सगळ्यांमुळे इतके अस्वस्थ झाले होते की मी माझे सर्वोत्तम देऊ शकलो नाही. मी ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नये, असा सल्ला अनेकांनी दिला, पण परंतु लोक मला जज का करत होते, हेच मला कळत नव्हतं,” असं ती म्हणाली.