स्टार प्रवाहवरील काही लोकप्रिय मालिकांमधील एक म्हणजे ‘अबोली’ (Aboli) ही मालिका. ‘अबोली’ ही मालिका तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करीत आहे. या मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी व अभिनेता सचित पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेने एक हजार एपिसोड्स पूर्ण केले. मालिकेचे आगळेवेगळे कथानक आणि मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेत दोन लोकप्रिय अभिनेत्रींची एन्ट्री झाली होती आणि या अभिनेत्री म्हणजे मयूरी वाघ (Mayuri Wagh) आणि जान्हवी किल्लेकर. मालिकेत इन्स्पेक्टर दीपशिखाच्या भूमिकेत जान्हवी किल्लेकर आणि शिवांगी देशमानेच्या भूमिकेत अभिनेत्री मयूरी वाघ दिसली. या दोन अभिनेत्रींच्या एन्ट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळंच वळण मिळालं होतं. समृद्धी नावाच्या मुलीच्या होणाऱ्या हत्यांभोवती हे कथानक फिरत होतं. मात्र, आता या कथानकातून मयूरी वाघची एक्झिट झाली आहे.
अभिनेत्री मयूरी वाघनं स्वत:च याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं सर्वांचे आभार मानले आहेत. त्यात तिनं असं म्हटलं आहे, “हा सुंदर प्रवास संपत असताना, मी स्टार प्रवाह आणि सतीश राजवाडेसर, संदीप सिकंदसर, सोल प्रोडक्शन, माझे सर्व सहकारी कलाकार, लेखक, क्रिएटिव्ह, दिग्दर्शक, डीओपी, चॅनेलचे एपी आणि संपूर्ण टीम ‘अबोली’ यांचे मनापासून आभार मानू इच्छिते. तुमच्या पाठिंब्याशिवाय हे कधीच शक्य झाले नसतं.”
पुढे तिनं असं म्हटलं आहे, “सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘शिवांगी’ म्हणून मला स्वीकारल्याबद्दल आणि प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल माझ्या प्रिय प्रेक्षकांचे आभार. या मालिकेचे माझ्या हृदयात कायमच एक विशेष स्थान असेल.” दरम्यान, मयूरी वाघनं साकारलेली शिवांगी बीडमधून मुंबईला आपल्या बहिणीच्या शोधात आली होती. तिची बहीण समृद्धी लग्नासाठी मुंबईला आली असताना अचानक गायब झाली आणि तिच्याच शोधासाठी शिवांगी धडपड करताना दिसली.
मात्र, आता ‘अबोली’ मालिकेच्या कथानकातून ‘शिवांगी’ भूमिकेचा प्रवास संपला आहे. तिच्या एक्झिटवर कलाकारांसह चाहत्यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. मालिकेतील सहकलाकार जान्हवी किल्लेकरनं मयूरीच्या पोस्टवर “तुझी आठवण येईल”, अशी कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनीही “मयूरी तुमची आठवण येईल”, “तुमची भूमिका खूप छान होती”, “पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.