मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय बालकलाकारांपैकी एक म्हणजे मायरा वायकुळ. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. तिनं लहान वयातचं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या वर्षी मायरा मोठी ताई झाली. तिची आई श्वेता वायकुळ यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव व्योम आहे. नुकतंच व्योमचं अन्नप्राशन झालं. याचा व्हिडीओ मायराच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी १५ सप्टेंबरला मायरा वायकुळचा भाऊ व्योमचा जन्म झाला. त्यानंतर काही महिन्यांनी व्योमचं मोठ्या थाटामाटात नामकरण सोहळा पार पडला. या नामकरण सोहळ्यासाठी खास शिवकालीन थीम करण्यात आली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर झाले होते. त्यानंतर आठ महिन्यांच्या व्योमचा नुकताच पारंपरिक पद्धतीनं अन्नप्राशन समारंभ पार पडला.
व्योमच्या अन्नप्राशन समारंभाचा व्हिडीओ मायराच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “व्योमचं अन्नप्राशन…अन्न हेच ब्रह्म आणि त्या ब्रह्मस्वरूप अन्नपूर्णा मातेच्या चरणी, आमच्या लाडक्या व्योमचं अन्नप्राशन विधी अत्यंत भक्तिभावाने, मंत्रोच्चारांच्या पवित्र गजरात, मंगलमय वातावरणात पार पडला. देवीच्या करुणामयी सान्निध्यात, सुवासिक गंध, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि दिवांच्या प्रकाशात, व्योमनं आपल्या आयुष्यातील पहिला घास घेतला. ती क्षणभराची अनुभूती, जणू आभाळ भरून आलं…आई अन्नपूर्णेच्या साक्षीने झालेले हे विधी, जणू वरदानचं लाभल्यासारखं वाटलं.”
पुढे लिहिलं आहे, “देवीच्या अन्नपूर्ण स्वरूपाशी त्याचं नातं या शुभ क्षणानं जुळलं. तिच्या कृपा छत्राखाली त्याचं बालपण आनंद, आरोग्य आणि सद्गुणांनी भरलेलं असो, हीच मन:पूर्वक प्रार्थना. हा मंगल प्रसंग आमच्यासाठी केवळ एक विधी नव्हता, तर श्रद्धेचा, नात्याचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा होता…आणि तो ठेवा, आमच्या आठवणींच्या दालनात सदैव उजळत राहो.”
दरम्यान, मायरा वायकुळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर मायरानं मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. नंतर २०२५ या वर्षाच्या सुरुवातीलाच मायरा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. या चित्रपटात तिनं जिजाची भूमिका साकारली होती.