मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळचा लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’, असं मायराच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात मायरासह स्पृहा परब, कल्याणी मुळ्ये, मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, प्रथमेश परब, सविता मालपेकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. संकेत माने यांनी मायराचा नवा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे सध्या मायरा खूप चर्चेत आहे.
नुकताच मायरा वायकुळचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यानिमित्ताने मायराने विविध एंटरटेनमेंट मीडियाशी संवाद साधला. तेव्हा मायराने छोट्या भावाकडून असलेल्या अपेक्षांबाबत सांगितलं.
अलीकडेच मायराने ‘मीडिया टॉक मराठी’ या युट्यूब चॅनलेशी संवाद साधला. तेव्हा तिला विचारलं की, भावाबरोबर एकत्र स्क्रीन शेअर करावी असं वाटतं का? यावर मायरा म्हणाली, “हो, मला मनापासून वाटतं. पण माझी अजून एक इच्छा आहे. माझ्या पप्पाचा आणि माझा खूप मोठा हट्ट आहे. आमच्या घरामध्ये एकतरी ऑलिम्पिकचं पदक पाहिजे. त्यामुळे मी ठरवलंय, मी त्याला ऑलिम्पिकमध्ये पाठवणार आहे. पण, माझी आणखी एक इच्छा आहे. म्हणजेच जर का त्याची आवड असेल तर आम्ही दोघं कधी तरी एका चित्रपट, जाहिरातीत किंवा इतर कोणत्याही माध्यमात एकत्र दिसावं, अशी माझी खूप मोठी इच्छा आहे.”
दरम्यान, गेल्या वर्षी मायरा वायकुळ मोठी ताई झाली. तिची आई श्वेता वायकुळ यांनी १५ सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर काही महिन्यांनी मायराच्या भावाचं मोठ्या थाटामाटात नामकरण सोहळा पार पडला. मायराच्या भावाचं नाव व्योम असं ठेवलं गेलं. व्योमच्या नामकरण सोहळ्याला शिवकालीन थीम करण्यात आली होती.
मायरा वायकुळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर मायराने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. या चित्रपटात ती मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशा तगड्या कलाकारांबरोबर झळकली. त्यानंतर आता ३१ जानेवारीला मायराचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ चित्रपट प्रदर्शित होतं आहे. या चित्रपटात तिने जिजाची भूमिका साकारली आहे.